गोंदिया दि. 16 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 24 ऑक्टोंबर रोजी मतमोजणी आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 126 अंतर्गत मतदानाच्या दिवसापासून 48 तास पूर्व प्रचार कार्यक्रम संपणार आहे. मतदारसंघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती व प्रचाराकरिता आलेले स्टार स्टार प्रचारक हे निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर विधानसभा मतदारसंघात राहिल्यास त्यांच्याकडून प्रचार मोहीम राबविली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हादंडाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंध आदेश लागू केले आहे. मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर म्हणजे 19 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजतापासून गोंदिया व तिरोडा विधानसभा मतदारसंघ आणि दुपारी 3 वाजतापासून अर्जुनी/ मोरगाव आणि आमगाव/ देवरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व संबंधित व्यक्ती तसेच निवडणूक प्रचार कार्यक्रमासाठी आलेले सर्व राजकीय पक्षाचे स्टार प्रचारक यांना जिल्ह्याच्या सीमेत राहण्यास मनाई करण्यात येत आहे.मतदारसंघातील मतदार नसलेले आणि मतदारसंघात निवडणूक लढवणारे उमेदवार किंवा त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांना हे आदेश लागू नाही. तथापि ही अट दारोदार प्रचार करन्यासाठी घरोघरी भेटीकरिता लागू राहणार नाही. सदर आदेश 19 ऑक्टोबर च्या सायंकाळी 6 वाजतापासून ते 22 ऑक्टोबरच्या रात्री 12 वाजतापर्यंत अंमलात राहील. मतदान संपण्याच्या 48 तासांमध्ये ध्वनिक्षेपकाच्या वापरावर पूर्णतः बंदी राहील.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल.असे जिल्हादंडाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी या आदेशाद्वारे कळविले आहे.




