मतदार जनजागृती बाबत जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना सहभागी होण्याचे आवाहन
गडचिरोली, दि.16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 चे अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत निवडणूक विभागामार्फत गडचिरोली जिल्हा मुख्यालयात दिनांक 17 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 6.30 ते 9.30 या वेळेत भव्य मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.सदर रॅली जिल्हा क्रिडांगण, पोटेगांव रोड गडचिरोली येथून शहरातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी काढण्यात येणार आहे.
यांमध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, विविध वयोगटातील मतदार, जेष्ठ नागरिक यांचा सहभाग राहणार असून दिव्यांग मतदारांसाठी ऑटो रिक्षाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच दुचाकी व सायकल रॅली यांचा सुद्धा सदर रॅलीमध्ये सहभाग असणार आहे. त्याच दरम्यान सकाळी 7.30 वाजता जिल्हा क्रिडांगण, पोटेगांव रोड, गडचिरोली येथे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. रांगोळी व चित्रकला स्पर्धेमधील विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसांची तरतूद करण्यात आलेली आहे.तरी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली यांचेवतीने सर्व नागरिक तसेच मतदार यांना आवाहन करण्यात येत आहे की, जास्तीत जास्त संख्येने जिल्हा क्रिडांगण,पोटेगांव रोड गडचिरोली येथे उपस्थित राहून मतदार रॅली तसेच रांगोळी व चित्रकला स्पर्धा यांमध्ये सहभाग नोदवावा.




