वाशिम, दि. १7: जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील ३७ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी सामान्य निवडणूक निरीक्षक (मायक्रो ऑब्झर्व्हर) यांचे प्रतिनिधी म्हणून हे सूक्ष्म निरीक्षक नियुक्त केले जाणार असून या सूक्ष्म निरीक्षकांचे दुसरे सरमिसळीकरण संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने आज सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, उपजिल्हाधिकारी (महसूल) रमेश काळे, मनुष्यबळ व्यवस्थापन अधिकारी तथा अधीक्षक प्रशांत जाधव, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील ३७ विधानसभा मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक होणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १२० टक्के प्रमाणात दुसऱ्या सरमिसळीकरणाद्वारे सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी १९, वाशिम विधानसभा मतदारसंघासाठी २१ आणि कारंजा विधानसभा मतदारसंघासाठी ०८ असे एकूण ४८ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.




