गोंदिया विधानसभा क्षेत्रात पदयात्रा
गोंदिया,दि.20 – निवडणूक आचारसंहितेनुसार, प्रचार बंदी होण्यापूर्वी शनिवारी पदयात्रा आणि रॅली काढून उमेदवारांनी सर्वाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. यात भाजप भाजप-सेना युतीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांनी शनिवारी दुपारी गोंदिया येथे पदयात्रा अग्रक्रम राखला.पदयात्रे दरम्यान पावसाला सुरवात असताना पदयात्रा रद्द न करता कार्यकर्त्यांमध्ये जोश भरत भर पावसातच पदयात्रा काढून त्यांनी आपले शक्ती प्रदर्शन केले.
स्थानिक गोरेलाल चौकातून शनिवारी दुपारी गोपालदास अग्रवाल यांच्या पदयात्रेला सुरवात झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि पक्षाचे झेंडे उंचावीत कार्यकर्ते पुढे जात होते. पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या गराड्यात गोपालदास अग्रवाल हे मध्यभागी राहून जनतेला अभिवादन करीत होते. भर पावसातही त्यांचा जोश आणि उत्साह कमी झाला नाही. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, शिवसेना जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे, माजी आमदार खोमेश रहांगडाले, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार रमेश कुथे, पंकज रहांगडाले, सुनील आसवानी, सुधीर कायरकर, अशोक चौधरी, चमनलाल बिसेन, बाबा बिसेन, संजय मुरकुटे, स्नेहा गौतम, जयप्रकाश बिसेन आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात काढण्यात आलेल्या पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी मतदार, व्यापारी संघटना सामाजिक कार्यकर्त्यांनी गोपालदास यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी गोरेलाल चौकात संबोधित करताना गोपालदास अग्रवाल म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात गेल्या पंधरा वर्षापासून विकासाची गंगा अविरत वाहत आहे.ती अशीच वाहत ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची साथ मिळाली आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलविण्यास आता कोणीच रोखू शकत नाही. काहीजण बंडखोरी करून असली नकलीचा दावा करीत आहेत. मात्र, जनतेला हे सांगण्याची गरज नाही. आपला या मतदारसंघातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. जनता आपल्या पाठीशी सदैव सक्षमपणे उभी राहून विकासाची पुन्हा एकदा संधी देईल, याचा विश्वासच नाही तर पूर्ण खात्री आहे. आपण देखील जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा निश्चित प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.





