26.3 C
Gondiā
Thursday, August 6, 2026
Home विदर्भ गोंदियाने विधानसभा निवडणुकीत नवा इतिहास घडविला

गोंदियाने विधानसभा निवडणुकीत नवा इतिहास घडविला

0
47

गोंदिया विनोद अग्रवाल (अपक्ष),तिरोडा विजय रहागंडाले(भाजप),आमगाव सहसराम कोरेटे(काँग्रेस),अर्जुनी मोर  मनोहर चंद्रिकापुरे(राँका)

गोंदिया,दि.24(खेमेंद्र कटरे)-महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालाला सुरवात झाली असून राज्यात पुन्हा भाजप सेना सरकार स्थापन करण्याकडे वाटचाल करीत आहे.त्यातच गोंदिया भंडारा जिल्ह्यात धक्कादायक निकाल समोर येऊ लागले असून गोंदिया मतदारसंघात पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार निवडणुक जिंकणार आहे.तर आजपर्यंत कधीच भाजपने गोंदिया जिल्ह्यात विजय मिळविलेला नाही,तो यावेळीही तसाच कायम राहणार आहे.आमदार अग्रवालांनी मुख्यमंत्री प्रेमापोटी घेतलेला निर्णय त्यांच्यावर उलटला असून मुख्यमंत्र्यांनी एकाच दगडात दोन शिकार या निवडणुकीत केले आहे.अग्रवालांना भाजपात घेऊन काँग्रेसला कमजोर करीत मतदारसंघातून काँग्रेसलाही संपविले आणि पक्षात घेऊन त्यांना पराभूत करुन त्यांचे राजकारणही संपविल्याचे बोलले जात आहे.अग्रवाल हे काँग्रेसमधूनच लडले असते तर त्यांना भाजपही पराभूत करु शकली नसती हे भाजपलाही ठाऊक होते,त्यामुळेच त्यांना पक्षात घेण्यात आल्याचे म्हटले आहे.तर पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडून आलेले विनोद अग्रवाल हे भाजपात जातात की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात याकडेही लक्ष लागले आहे.मतमोजणीच्या आदल्यादिवशी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेलांची भेट घेतल्याची चर्चा असून ते राष्ट्रवादीतही जाऊ शकतात असा कयास लावला जात आहे.तर गोंदियात काँग्रेसचे उमेदवार अमर वराडे यांना अनामतही वाचविता येणे कठीण झाले आहे.काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात खुले आम गोंदिया विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने केलेल्या प्रचाराचा फटका याठिकाणी बसला असून भविष्यात गोंदिया,तिरोडा मतदारसंघातून राष्ट्रवादी बाद झाल्याचे चित्र बघावयास मिळू शकते.

दुसरीकडे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपचे राजकुमार बडोले हे आघाडीवर राहतील अशी शक्यता होती,मात्र ते पहिल्या राऊंडपासून मागे चालले असून राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापूरेनी आघाडी घेतली.या मतदारसंघात माजी मंत्री बडोले यांच्याप्रती मतदारात आपुलकी दिसून येत होती.तर चंद्रिकापुरेंना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सहकार्य केले नव्हते अशा परिस्थितीत त्याठिकाणी काँग्रेसच्या मतदारांनी चंद्रिकापुरेंना सहकार्य केल्यानेच ते आघाडीवर गेल्याचे दिसून येत आहे.

याउलट तिरोडा मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडी घेणार असे चित्र होते.उमेदवारी देतेवेळी सर्वानी आम्ही सोबत राहू असे सांगितले होते,मात्र तो फक्त राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षासह सर्वच जिल्हापरिषद सदस्यांचा देखावा होता हे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे.तर काँग्रेसच्याही तिरोड्यातील नेत्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ दिलेली नसल्याचे दिसून आले. अपक्ष दिलीप बनसोड यांचा राष्ट्रवादीला फटका बसल्याचे चित्र दिसून येते.बनसोड यांनी घेतलेल्या मतावरुन राष्ट्रवादीतील मतभेद स्पष्टपणे समोर आले असून राष्ट्रवादीत पोवार विरुध्द गैरपोवार वाद पेठविण्यात काहीं प्रमाणात यश आल्याचे या निकालावरुन दिसून येत आहे. सोबतच राष्ट्रवादी व काँग्रेसच्या तिरोड्यातील नेत्यांच्याच मतदारसंघात राष्ट्रवादी माघारल्याने नेत्यांनी कितपत इमानेइतबारे काम केले हे त्यांच्या या अभियानावरुन दिसून येत आहे. फक्त पैसावर लक्ष केंद्रित करुन आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या पराभावसाठी काम केल्याच्या चर्चांना तिरोडा येथील मतमोजणी परिसरात उधाण आले आहे. बहुतांश राष्ट्रवादीचे नेते हे मतमोजणीकडे फिरकलेच नसल्याचे दिसून आले.त्यातच 2009 मध्ये सुध्दा राष्ट्रवादीने पोवार उमेदवार दिला होता,2014 मध्ये आणि 2019 मध्ये या तिन्ही निवडणुकीत पोवार समाजातील राष्ट्रवादीचा उमेदवार पराभवाला सामोरे गेल्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेत्यांसह जिल्ह्यात धुरा सांभाळणार्या नेत्यांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.तिरोड्यातून राष्ट्रवादीलाच पोवार आमदार नको असा एक संदेश या तिन्ही निवडणुकीच्या निकालातून काँग्रेसच्या मदतीने दिला गेल्याचे दिसून येते.आमगाव मतदारसंघात काँग्रेसचे सहसराम कोरेटी यांनी आघाडी घेतली असून भाजपचे संजय पुराम हे अवघ्या काही मतांनी माघारीवर आहेत.या मतदारसंघात मात्र दोन्ही काँग्रेसने एकदिलाने काम केल्याचे चित्र निकालात दिसून येत आहे तिरोड्यात दिसून आले नाही.

भंडारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचा विचार केल्यास साकोली मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले असून या मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले व भाजपचे डाॅ.परिणय फुके यांच्यात सरळ लढत होत असून भाजपचे डाॅ.परिणय फुके यांनी आघाडी घेतली होती.याठिकाणाहून पटोले पराभूत झाल्यास पटोलेंचे राजकारणच पुर्णत संपणार आहे.ज्यांना विधानपरिषदेची पायरी पटोलेंनी दाखवली त्यांच्याकडूनच त्यांना पराभव पत्करावा लागणार हे त्यांच्यासाठी महत्वाचे ठरणार असून राजकारणात केलेल्या काही चुकांचे परिणाम त्यांना या निवडणुकीत मिळत असल्याचे मतदारांचे म्हणने आहे. तुमसर मतदारसंघात राष्ट्रवीदीचे राजु कारेमोरे व अपक्ष चरण वाघमारे यांच्यातच लढत दिसून येत असून कारेमोरे यांनी आघाडी घेतली आहे.याठिकाणी भाजपचे उमेदवार जिल्हाध्यक्ष इंजि.प्रदिप पडोळेंना तिसर्या क्रमांकावर राहण्याची वेळ आली आहे.तर भंडारा येथे अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजप उमेदवारापेक्षा अधिक मते घेत आघाडी घेतली असून काँग्रेस उमेदवार तिसर्या क्रमांकावर दिसून येत आहे.