30.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ काटोलचा गड अनिल देशमुखांचा तर सावनेर गड सुनिल केदारांनी राखला

काटोलचा गड अनिल देशमुखांचा तर सावनेर गड सुनिल केदारांनी राखला

0
36

नागपूर,दि.24 : जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण काटोल-नरखेड मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी 94 हजार 628 मते घेत 16 हजार 272 मतांनी “विजयीश्री’ खेचून आणली. भाजपचे उमेदवार माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना 78 हजार 356 मतांवर समाधान मानावे लागले.सलग चारवेळा काटोल सर करणारे माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भाजपने यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती. मात्र ते काटोलमधून देशमुखांचा करिश्‍मा कमी करू शकले नाहीत. मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी देशमुखांनी पूर्ण तयारी केली होती हे विशेष. मागील पाच वर्षांत पराजयानंतरही लोकांसाठी लढा उभारणारे अनिल देशमुख यांच्या वाड्यावर गर्दी वाढतच होती. याचमुळे त्यांना यावेळी विजयाची संधी असल्याचे वाटत आहे. अनिल देशमुखांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आल्यानेही त्याचाही प्रभाव मतदारांवर राहणार आहे. पूर्ण देशमुख कुटुंबीय प्रचारात उतरले होते. शेतकरीपुत्र व शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता ही प्रतिमा त्यांनी मागील पाच वर्षांत कायम राखली आहे.

या मतदारसंघात 1966 मतदारांनी नोटाचा वापर केला. एकूण मतदान 1 लाख 85 हजार 812 झाले. एकूण 10 उमेदवार रिंगणात होते. बहुजन समाज पार्टीचे मोहम्मद वकीबाब 1340 मते, वंचित बहुजन आघाडीचे दिनेश टुले यांना 5 हजार 417 मते, प्रहार पक्षाचे प्रदीप उबाळे यांना 808 मते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दामोधर धुर्वे यांना 973 मते मिळाली. एकूण पोस्टल बॅलेट 1217 पैकी अनिल देशमुख यांना 704 तर चरणसिंग ठाकूर यांनी 441 व वंचित बहुजन आघाडीचे दिनेश टुले यांना 42 मते मिळाली. विशेष म्हणजे 9 शासकीय कर्मचाऱ्यांनी “नोटा’चा वापर केला.

सावनेर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार 20 हजार 227 मतांनी विजयी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांचा त्यांनी पराभव केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यांचा सावनेर मतदारसंघातील कळमेश्‍व येथे पोहचल्यावर डॉ. राजीव पोतदार यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून डॉ. पोतदार यांची बाजू उमेदवारीसाठी मजबूत झाली होती. ते 2004 पासून भाजपकडे उमेदवारीसाठी तगादा लावत होते. मध्यंतरी युतीमध्ये सावनेरची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी करून खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्र्याचे लाडके असलेल्या पोतदारांवर त्यांचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नव्हते. यातच सिल्लेवाडा येथे स्टार बससेवेच्या उद्‌घाटनाचा वाद भाजपच्या पथ्यावर पडला. पोतदार यांची उमेदवारी निश्‍चित होण्याचा मार्गही मोकळा झाला. तेव्हापासूनच सावनेरची लढत ही केदार यांच्यासाठी सोपी नसेल असे चित्र दिसू लागले होते.सावनेरच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या केदार यांनी ही बाब अचूक हेरली. कॉंग्रेसच्या पहिल्याच यादीत नाव आल्याने त्यांचे कॉंग्रेसमधील वजनही वाढल्याचे समोर आले. शिवाय भाजपवरही दबाव वाढविण्यात ते यशस्वी ठरले. उमदवारी अर्ज दाखल करताना सावनेरमध्ये जमलेली केदार समर्थकांची गर्दी त्यांच्या वर्चस्वाची पावती देणारी होती. यामुळे भाजपच्या गोटात धडकी भरली. केदार यांचा आक्रमक प्रचार सुरू आहे. तेवढीच आक्रमकता भाजप दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. अमित शहा यांची खापरखेडा येथील सभेचा प्रचार केल्यानंतर ती रद्द झाल्याने भाजपच्या प्रचाराची धार बोथड झाली हे विशेष.