
भंडारा,दि.26ः-पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील नागरिकांना अत्यल्प दारात मिळालेल्या आरोग्य सुविधांमुळे त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाल्याचे प्रतिपादन खासदार सुनील मेंढे ह्यांनी दिवाळीनिमित्त आयोजित आयुष्यमान भारत च्या लाभार्थींसोबत आयोजित दिवाळी फराळ च्या कार्यक्रमात बोलताना केले. खासदार मेंढे ह्यांच्या घरी आज सकाळी आयोजित ह्या कार्यक्रमात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आवर्जून उपस्थित होते.
सर्वसामान्यांना मोठ्या आजारांसाठीच्या वैद्यकीय सेवा खर्चिक असल्याने परवडत नाहीत. अशांसाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली. ह्या अंतर्गत आज पर्यंत ९ करोड हुन अधिक कार्ड वितरण झाले आहेत. देशभरात ३६ लाख हुन अधिक जणांनी ह्या योजनेअंतर्गत आरोग्य सुविधांचा लाभ घेतला असून भंडारा मतदारसंघात अनेक रुग्णांनी ह्या योजनेचा लाभ घेतला असल्याचे मेंढे ह्या प्रसंगी बोलताना म्हणाले.” आयुष्यमान भारत योजनेमुळे, विविध आजारांवरती चांगले उपचार परवडणाऱ्या दरात आम्हाला मिळाले” अशी प्रतिक्रिया ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लाभार्थ्यांनी दिली. आपण निवडून दिलेल्या खासदारांच्या घरी अत्यंत अनौपचारिक स्वरूपात घरगुती वातावरणात हा कार्यक्रम पार पडल्याचे समाधान सहभागी लाभार्थ्यांनी व्यक्त केले.




