
गडचिरोली,दि.२8: जिल्ह्यात नक्षल्यांशी लढताना आतापर्यंत २०९ पोलिस शहीद झाले आहेत. त्यात १६६ जवान हे गडचिरोली जिल्ह्याच्या आस्थापनेवरील आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबीयांची दिवाळी आनंदात जावी म्हणून पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांना मिठाई, फराळ व फटाके वाटून त्यांच्याशी हितगूज केली. यावेळी शहीद जवानांचे कुटुंबीय भावूक झाले.
गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने येथे नक्षली कारवाया होत असतात. नक्षल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस जवान सतत डोळ्यात तेल ओतून पहारा देत असतात. दिवाळी असो की कोणताही सण, हे जवान आपल्या कर्तव्यावर तैनात असतात. आतापर्यंत जिल्ह्यातील १६६ जवान शहीद झाले आहेत. दिवाळीसारखा सण आल्यास कुटुंबप्रमुख नसल्याने शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या मनात अश्रू तरळतात. मात्र त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये म्हणून शनिवारी(दि.२६) पोलिस विभागातर्फे ‘शहीद कुटुंबीयांसोबत दिवाळी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोंदिया जिल्हाधिकारी डाॅ. कादंबरी बलकवडे, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अजयकुमार बन्सल, सौ.निधी बन्सल, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले उपस्थित होते.
यावेळी पोलिस अधीक्षकांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मिठाई, फराळ व फटाके वाटून त्यांच्याशी हितगूज केली. शहीद जवानांचे बलिदान नेहमीच पोलिस दल व जिल्हावासीयांच्या स्मरणात राहील, तसेच नक्षलविरोधी लढ्यात ते प्रेरणा देत राहील, असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले. यावेळी गोंदियाच्या जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनीही आपण शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहीद कुटुंबातील अमृतकर, वाघाडे यांनी मनोगत व्यक्त करताना शहीद कुटुंबीयांसाठी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पोलिस विभागाचे आभार मानले. सपना सयाम या विद्यार्थिनीने आपल्या शहीद वडिलांचे स्मरण करुन वडिलांच्या शौर्याचा अभिमान असल्याचे सांगितले. तसेच देशसेवेसाठी पोलिस दलात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली. याप्रसंगी शहीद जवान सुरेश गावडे यांची कन्या अपूर्वा गावडे हिने सादर केलेल्या कवितेमुळे सर्वजण भावूक झाले.




