27.9 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश दिपोत्सवातून कथाप्रेरणा  

दिपोत्सवातून कथाप्रेरणा  

0
86

अंधाराची खंत तू कशाला करशी रे ऽ ऽ ऽ

गा प्रकाशगीत…

हे गाणं जेव्हा-जेव्हा मी ऐकतो तेव्हा-तेव्हा मला डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील यांची आठवण येते. ‘तिमिरातून तेजाकडे…’ अशी नेहमी त्यांची वाटचाल असते. आपल्या प्रकाशन व्यवसायात नवनवीन कल्पना, काही हटके प्रयोग, अफलातून योजना व त्यांची निष्णात अंमलबजावणी या ध्यासामुळे ही पती-पत्नीची जोडी नेहमी अंधारातल्यांना प्रकाशात आणायचा प्रयत्न करत असते.

मी जिल्हा शिक्षणाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आता काय करायचे? हा प्रश्न मला पडतो न पडतो तोच डॉ. सुनील दादा पाटील यांनी मला गाठले आणि माझा हात धरून माझ्यातले गुण ओळखून मला माझ्या ‘आपली नाती’ या काव्यसंग्रहाद्वारे प्रकाशात घेऊन आले. अजूनही त्यांनी माझा हात सोडला नाही. नवीन लेखकांच्या साहित्यकृतींना प्रस्तावना लिहिणे, त्यांची समीक्षणे करणे, रसग्रहणे लिहिणे अशा या ना त्या निमित्ताने मला नेहमी प्रकाशात ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

संस्काराचे पाणीसुद्धा

पूर्वीसारखे झरत नाही

वळवाच्या पावसासारखे

पडले तरी मुरत नाही

यासाठी प्रत्येकाठायी मोजकेतरी संस्कार असावेच लागतात. आता हेच पहा ना… दिवाळी अंकाच्या दुनियेत चंचूप्रवेश करायचा आणि दरवर्षी प्रत्येक साहित्यकृतीवर निवडकातून निवडून त्यांचा एक आकर्षक दिवाळी अंक काढायचा ही कल्पना स्फुरणे आणि तात्काळ त्याची अंमलबजावणीसुद्धा करणे हे वर्तन वरील माझ्या लेखनास पाठबळ देणारेच आहे ना?

‘कथासागर’ दीपोत्सव २०१९ या दिवाळी अंकास अतिथी संपादकीय लिहिण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर टाकली व त्यांच्याकडील संस्कारानुसार मीही गपगुमान हे संपादकीय लिहिले.

हा दिवाळी अंक एकमेवाद्वितीय, अव्वलदर्जाचा, जागतिक कीर्तीचा वाङ्‌मयीन दिवाळी अंक असायला हवा अशी प्रकाशक व मालक म्हणून डॉ. सुनील दादा पाटील यांची आंतरिक इच्छा आणि त्यात वावगे ते काय? त्यांनी या ‘कथासागर’ दीपोत्सव २०१९ साठी ‘कथा’ हा वाङ्‌मयीन प्रकार निवडून एकूण सोळा निवडक कथांचा यामध्ये समावेश केला आहे. समाजात निरंतर काही ना काही घडत असते. चांगले, वाईट, अनाहूतपणे, निसर्ग प्रेरणेतून अशा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जे घडत असते त्यास शब्दरूप देऊन, गोष्टीरूपाने इकडचे तिकडे कळविणे म्हणजे कथारूप आणणे. काही काही वेळा राईचा पर्वत करावा लागतो तर असतानाचे नव्हते तर नसतानाचे होते असेही करावे लागते.

मनोरंजकता, वास्तवाचं भान आणि प्रबोधन या तीन मेड्क्यांचा आधार घेऊन लिहिलेली कथा वाचकांना आवडून जाते. ‘कथासागर’ दीपोत्सव २०१९ या दिवाळी अंकामध्ये समाविष्ट केलेल्या काही निवडक कथांचा परामर्श घ्यायला मला आवडेल.

ज्येष्ठ साहित्यिक अशोक दादा पाटील यांची ‘आहुती’ ही कथा बळी देणे या विषयाशी निगडीत आहे. ती समाजाच्या भल्यासाठी स्वतःच्या अपत्याचा बळी द्यायला तयार झालेल्या समाजप्रेमी पण अंधश्रद्धेचा स्वतः एक बळी असणार्‍याची ही कथा असून तिची मांडणी वाचकास आकर्षून घेते.

‘थोरली आई’ ही सुनील कृष्णा आसवले यांची कथासुद्धा एका समाजसेवी महिलेची असून तीही परित्यक्ता स्त्रियांसाठी स्वतःची जमीन गावास देऊ करते.

‘मुलगाच पाहिजे म्हणून…’ ही मनोहर महादेव भोसले या हरहुन्नरी लेखकाची कथा मुलगा-मुलगी जन्माला घालणे हे पतीवर किंवा पत्नीवर अवलंबून नसते तर नैसर्गिक गुणसूत्रांवर अवलंबून असते. यातून होणार्‍या घटस्फोटा- सारख्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारी आहे.

‘मन विकारी झाले की, विचारही गढूळ होतात, विचार गढूळ झाले की, विवेक नष्ट होतो. विवेक नष्ट झाला की, आचार भ्रष्ट होतात.’ या सुविचाराशी संबंधित सौ. विजया प्रवीण बन्ने यांची ‘वरात’ ही कथा आहे. आपल्या मुलाचे सुंदर मुलीशी लग्न लावून देऊन सुनेवर वाईट नजर ठेवणारा सासरा आणि त्यात मुलाचा अंत. अशा आशयाची ही कथा समाजातील दुर्विचारी माणसांचे प्रतिबिंब वाचकास दाखवून विचारात बुडून जायला भाग पाडते.

‘वात्सल्याचा झरा’ आणि ‘आईचा त्याग’ या अनुक्रमे अशोक भीमराव रास्ते आणि राज धुदाट या लेखकांच्या कथा आपल्या पोटच्या अपत्यासाठी आईने घेतलेले अपार कष्ट आणि असीम त्याग यांचे गोष्टीरूपाने वर्णन करतात.कृष्णा ज्ञानू पाटील या लिहिण्याची आवड असणार्‍या एका नगरपालिका कर्मचार्‍याच्या कुंचल्यातून उतरलेली ‘आकांत’ ही कथा मन वेधून घेते.

या ‘कथा’ रुपी ‘दीपोत्सव २०१९’ चे अतिथी संपादकीय लिहिताना यातील सर्वच कथांचा सारांश मी इथे सांगितला तर वाचक हो…! तुम्ही पुढे संपूर्ण दिवाळी अंक वाचाल याची खात्री देता येत नाही. म्हणून मी एवढ्याच सात-आठ कथांचा उल्लेख करून आपणास संपूर्ण दिवाळी अंक वाचून काढण्यास प्रेरित करतो.

दीपावली हा भारतीयांचा एक आनंदोत्सव आहे. सर्व मानवी नात्यांचा हा एक आनंद मेळावा असतो. गरिबातला गरीबही या सणात जसे जमेल तसे गोड-धोड खातो, पहाटे उटणे लावून आपल्या परीने अभ्यंगस्नान करतो. सर्व दु:खांना, भोगांना बाजूला सारून आनंदमय गरम धाग्याने विणलेल्या उबदार शालीमध्ये या दिवाळीच्या थंड वातावरणात स्वतःला विसावून घेतो.

डॉ. सुनील दादा पाटील आणि कुटुंबीयांनी या दिवाळी अंकाच्या माध्यमातून समाविष्ट सर्व सोळा कथाकारांच्या मनात दिवाळीच्या मिठाईची व फटाक्यांच्या आतिषबाजीची मेजवानी पुढ्यात ठेवली आहे. आपली कथा ‘कथासागर’ या दीपोत्सवात आली आहे हा आनंद त्यांच्या मनात आकाश कंदिलासारखा तेवत राहील.

 ‘कथासागर’ दीपोत्सव २०१९ हा एक आगळावेगळा दिवाळी अंक आपल्या हाती देताना आम्हाला अत्यानंद होत आहे. मी यापूर्वी अनेक साहित्य प्रकारात लेखन केलेले असले तरी कथा या प्रकारावर माझे सुरुवातीपासून प्रेम आहे. शब्दांचा कसा उपयोग करून घ्यावा हा प्रत्येक लेखकाला पडणारा महत्वाचा प्रश्न आहे. आपली कथा त्यातील प्रत्येक प्रमुख पात्रांच्या दृष्टीकोनातून कशी घडेल, याचा मी आढावा घेतो. लेखकानं वाचकानुनय करावा, असं मी अजिबात म्हणत नाही; पण आपलं लेखन  हे ‘लोकाभिमुख’ असावं असं मला मनापासून वाटत आलं आहे. अगदी छोट्या प्रसंगावरसुद्धा कथा होऊ शकते, जसं सुचेल तसं लिहून काढा, त्यासाठी आधी कागद, पेन घेऊन लिहायला सुरुवात करा. कथेसाठी हेच नियम लागू आहेत असे नाही, पण हे नियम वापरले तर कथा लिहिणे सुकर होईल. (१) पहिल्यांदा लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न करावा. (२) साधारण ८०० शब्दापर्यंत एक छान लघु कथा लिहिता येते. (३) लघुकथेत जास्तीत जास्त तीन, कमीत कमी एक पात्र असावे, पात्रांची संख्या जास्त असल्यास, वाचणार्‍याचा गोंधळ उडू शकतो.

कथेमध्ये पुढील  घटकांचा समावेश असला पाहिजे:

(१) कथानक (कथेत काय घडणार आहे ते…)

(२) भावना (कथानक घडताना, कथेतील पात्रांना काय वाटले, त्यांच्या मनातील घालमेल, ते कसे व्यक्त झाले, हे सर्व)

(३) कथानक = भावना, नुसत्या भावना लिहून काही उपयोग होत नाही किंवा नुसते कथानक लिहून अपेक्षित परिणाम साधता येत नाही, त्यामुळे या दोन्ही बाजू एकाच प्रमाणात ठेवण्याचा प्रयत्न करावा.

(४) जमल्यास शेवटी कथेला अनपेक्षित वळण (ट्विस्ट) देण्याचा प्रयत्न करावा.

आयुष्यात अनेक माणसं भेटत राहतात. काही कायम सोबत राहतात, तर काही एखाद्या वळणावर साथ सोडून जातात. ही अशीच काही माणसं पुस्तकांमधूनही भेटतात. पात्रांमधून भेटलेली माणसं मनात रुंजी घालतात.

कथा आम्हाला घडवत नाहीत तर त्या घडत राहतात. नवोदित लेखकांनी स्वत:ची अशी वेगळी लेखन शैली विकसित करायला पाहिजे. कथेचे शीर्षक कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने सुचते. कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारची उद्दिष्टे आणि तद् नुषंगाने आलेली आशय आणि अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी संपन्न आहे. आधुनिक काळात, म्हणजे गेल्या शतकातच कथेची लघुकथा झाली व आज कथा म्हणजे लघुकथा असेच सामान्यतः मानले जाते. एक कथात्मक साहित्याचा प्रकार म्हणून कादंबरी आणि कादंबरिका यांच्याशी लघुकथेचे जवळचे नाते आहे.

एखादी कथा पडद्यावर आणताना त्याची पटकथा आणि संवाद लिहिणे हे कौशल्याचे, तसेच तांत्रिक काम आहे. कथा आणि चित्रपटासाठी लिहिली जाणारी स्क्रिप्ट यामध्ये बरीच तफावत असते. आपल्या वनलाईनच्या शेवटाकडे आपण कसे जाणार याचा प्रवाह निश्चित करणे म्हणजेच ही पटकथा विकसित करणे होय. हा प्रवाह निवडण्यासाठी मग प्रसंगांची रचना करावी लागते. त्याआधी या पटकथेसाठीच्या पात्रांची निश्चिती करावी  लागते. आपली गोष्ट प्रत्यक्ष कशी मांडली की ती  प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याचा आपल्याला बारकाइने विचार करावा लागेल.

दररोज आपल्या आजूबाजूला वावरणार्‍या, आपल्याला भेटणार्‍या प्रत्येक चेहर्‍यामागे अशीच एक कथा लपलेली आहे. प्रत्येक कथा हा स्वानुभव नसतो. दुसर्‍याचा अनुभव, निरीक्षण, आत्मभान समजून घेतले तर तो अनुभव आपला होतो. कादंबरीप्रमाणे कथेला विशिष्ट कालक्रमाने घडलेल्या घटनांचे बनलेले कथानक असते, ज्यांच्या संदर्भात ह्या घटना घडल्या ती पात्रे असतात, ज्या स्थळी व काळी त्या घडल्या तो स्थळकाळ असतो, त्या घटनांशी संबंध अशा भाववृत्तीने निर्माण केलेले एक वातावरण असते, निवेदक कोण? घटनांशी संबंधित असलेली एक व्यक्ती की एक तिऱ्हाईत व्यक्ती, यामुळे अगदी स्वाभाविकपणे निश्चित झालेली निवेदनशैली असते. पात्रांच्या व घटनांच्या परस्परसंबंधांतून निर्माण झालेले ताण, संघर्ष, गुंतागुंत ही असतात, त्यांचा उत्कर्षबिंदू असतो आणि कथेच्या शेवटी एका अर्थाने त्यांचा उपशमही होत असतो. एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्परसंबंधांतून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजे लघुकथा, अशी लघुकथेची व्याख्या करता येते. लेखन करताना काना, मात्रा, उकार, वेलांटी याकडे विशेष लक्ष द्यावे.

वेद साहित्याइतकेच इजिप्तमधील वेस्टकार पपायरीवरील साहित्य प्राचीन होय. या प्राचीन इजिप्ती साहित्यातही कथाकथनाची अत्यंत लक्षणीय परंपरा आढळते, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यातील ‘द टेल्स ऑफ द मॅजिशियन्स’चा उल्लेख वरचेवर येतो. या कथांचा काळ इसविसनपूर्व ४००० ते ३००० वर्षांचा आहे. ईजिप्ती वाङ्‌मयाप्रमाणे प्राचीन ग्रीक साहित्यातही कथा आहेत आणि ख्रिस्ती धर्मीयांच्या धर्मग्रंथांपैकी ओल्ड टेस्टामेंटमधील रूथ आणि जोन्ससारख्या नाट्यात्म कथा तर सर्वपरिचित आहेत. तेराव्या व चौदाव्या शतकांतील महानुभाव गद्य साहित्याचे समकालीन जे आंग्‍ल साहित्य आहे, त्यांतील चॉसरने (१३४०-१४००) लिहिलेल्या ‘कँटरबरी’ कथा व त्याच काळात बोकाचीओ (१३१३-१३७५) या इटालियन लेखकाने लिहिलेल्या व देकामेरॉन या नावाने ओळखल्या जाणार्‍या संग्रहात उपलब्ध होणार्‍या कथा या संदर्भात लक्षात घेण्याजोग्या ठरतात.

 ‘कथासागर’ या दीपोत्सवाच्या निमित्ताने डॉ. सुनील दादा पाटील (संपादक व प्रकाशक), मंगेश विठ्ठल कोळी (कार्यकारी संपादक), तसेच कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूरमधील सर्व समावेशित धुरंधर, बुद्धिवादी आणि त्यांच्या कुटुंबियांना व मित्रपरिवाराला ही दिवाळी आनंदाची, सुखाची आणि भरभराटीची जावो……आणि हो…! आपण वाचक माय-बाप मंडळी तर या प्रकाशविश्वातले टिपूर चांदणे आहात. आपणासही दीपावली २०१९ च्या भरभरून शुभेच्छा…!

तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची दिवाळी करी तमसो मा ज्योतिर्गमय…

– अतिथी संपादक

आबासाहेब मारुती सूर्यवंशी(सेवा निवृत्त जिल्हा शिक्षणाधिकारी)

  • कथासागर दीपोत्सव २०१९
  • संपादक – डॉ. सुनील दादा पाटील
  • मूल्य – ३००
  • कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर
  • संपर्क: ९९७५८७३५६९, ८४८४९८६०६४