25.5 C
Gondiā
Wednesday, August 5, 2026
Home राजकीय सत्तेसाठी भांडणे सुरू, शेतकरी मात्र वाऱ्यावर-आमदार पटोलेंचा आरोप

सत्तेसाठी भांडणे सुरू, शेतकरी मात्र वाऱ्यावर-आमदार पटोलेंचा आरोप

0
34

भंडारा ,दि.31 : :: ऐन दिवाळीत २५ ते २६ ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे धान पाण्यात बुडाले आहेत. धानाला कोंब आलेले असूनसुद्धा सरकारकडून त्याचे सर्वेक्षण व पंचनामे करायला हवे होते; मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सत्तेसाठी भाजप व शिवसेना बोक्यासारखे भांंडत आहेत, अशी तिखट प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार नाना पटोले यांनी  शासकीय विश्रामभवनात आयोजित पत्रपरिषदेत दिली.पत्र परिषदत बीडीसीसी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, उपाध्यक्ष सदाशिव वलथरे उपस्थित होते..

यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सगळीकडे दिवाळीचा आनंद व्यक्त होत असतानाच परतीच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अगदी हातात आलेले धानपीक पाण्यात बुडाले. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. धानपीक पाण्यात असल्याने त्यांना कांेब येऊन मातीमोल झाले. शासनाकडून त्याचे वेळीच सर्वेक्षण करून पंचनामे व्हायला पाहिजे होते, मात्र निवडून आलेले भाजपा नेते व शिवसेनेचे आमदार सत्ता स्थापनेसाठी भांडत आहेत. जिल्हा प्रशासनाकडे सर्व्हे व पंचनामे करायला यंत्रणाच नाही. तर जिल्हाधिकारी उपस्थित नाही. निवासी जिल्हाधिकारीही जिल्ह्यात नाहीत. शेतकऱ्यांनी त्यांची वाट पहात बसायची काय. मी मुंबईला जात असून सध्या असलेल्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना भेटून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा सांगून एकरी १५ हजार रुपयाची मागणी लावून धरणार आहे..

सरकारला अजून किती शेतकऱ्यांची आत्महत्या पाहिजे आहे. सरकार धान खरेदीसाठी आता शेतकऱ्यांना विचारत आहे. माझी जात व धर्म शेतकरीच आहे. त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की त्यांनी त्वरित धान पिकाचे पंचनामे करून सरसकट एकरी १५ हजार रुपये द्यावे व त्यांच्यावर असलेले बॅंकेचे पूर्ण कर्ज माफ करून व पीक विम्याची जाचक अट रद्द करून पीकविम्याचे पैसे त्वरित द्यावे. व्यापाऱ्यांना सूट देण्यासाठी सरकारने तिजोरी खुली केली. आता देशाच्या अन्नदाता शेतकऱ्यांसाठी आपली तिजोरी खुली करायला पाहिजे असे विचार आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.