
- जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०२ : जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये आंबिया बहारातील संत्रा, डाळिंब व आंबा या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
आंबिया बहारातील संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा, राजगाव, रिसोड तालुक्यातील रिसोड, केनवड, भरजहांगीर, रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस, मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, पोटी, कवठळ, धानोरा, शेलूबाजार, पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी बु., कुपटा तसेच कारंजा तालुक्यातील कारंजा, उंबर्डा बाजार, कामरगाव, धनज बु. पोहा, हिवरा लाहे, येवता या महसूल मंडळांचा समावेश विमा योजनेत करण्यात आला आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी २५ हजार ६६७ रुपये असून शेतकऱ्यांना १ हजार २८३ रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत आहे.
डाळींब या फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डीआसरा, पार्डी टकमोर, नागठाणा, राजगाव, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, कवठळ, आसेगाव, धानोरा, शेलूबाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील उंबरी बु. या महसूल मंडळांचा समावेश आहे. डाळिंब या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ४० हजार ३३३ रुपये असून शेतकऱ्यांना फक्त २ हजार १७ रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. डाळिंब पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ जानेवारी २०२० पर्यंत आहे.
आंबा या पिकाकरीता वाशिम तालुक्यातील केकतउमरा व राजगाव, मानोरा तालुक्यातील मानोरा या महसूल मंडळांचा समवेश विमा योजनेत करण्यात आला आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर ४० हजार ३३३ रुपये विमा संरक्षण मिळणार असून याकरिता २ हजार १७ रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरावयाचा आहे. आंबा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी केले आहे.




