गोंदिया : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस तसेच स्व. इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्ताने पोलिस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे उपविभागीय पोलिस अधीकारी गोंदिया तथा अति. कार्य. पोलिस उप-अधीक्षक (मुख्य) जगदीश पांडे यांच्या हस्ते इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चैलचित्राला माल्यापर्यण करून अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात पोलिस निरिक्षक एम.बी. जाधव यांनी स्व. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अनेक महत्वाचे कार्य करून दिल्याची माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी गोंदिया तथा अति. कार्य पोलिस उप-अधीक्षक (मुख्या) जगदीश पांडे यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथचे वाचन करून त्यापाठोपाठ उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी शपथ घेतली. पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व तत्सम यंत्रणेच्या साहाय्याने ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी १६ वाजता स्व. इंदिरा गांधी स्टेडीय गोंदिया येथून परेड संचलनाला सुरुवात करण्यात आली.
सदर संचलन नेहरू चौक, आंबेडकर चौक, जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, बाबुजी व्यायाम शाळा, यादव चौक, अंडर ग्राउंडे, रेल्वे मालधक्का सदर मार्गाने राजलक्ष्मी चौक येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ माल्यार्पण करून व राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन परेड संचलनाची सांगता करण्यात आली. सदर परेच संचलनामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी गोंदिया तथा अति. कार्य. पोलिस उपधीक्षक जगदीश पांडे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी व होमगार्डस यांचाही सहभाग होता.




