भंडारा,दि.05-जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसह भाजप सरकारच्या धोरणाविरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने ६ नोव्हेंबरपासून प्रत्येक तालुकास्थळी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रभारी प्रफुल्ल गुडधे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, भाजप सरकारच्या धोरणामुळे देश संकटात सापडला आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस खालावत आहे. नवीन रोजगार निर्मीती पूर्णपणे ठप्प असून महागाई गगनाला भिडली आहे. नुकत्याच आलेल्या पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी तसेच भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध हे ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.
६ नोव्हेंबरला साकोली येथे, ७ ला पवनी, मोहाडी व लाखनी येथे तर ८ नोव्हेंबरला लाखांदूर, तुमसर व भंडारा येथील तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर भंडारा येथे तीव्र आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे, प्रदेश सचिव मुजीबभाई पठाण, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे, सीमा भूरे आदी उपस्थित होते.




