26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ बालकामगार निर्मुलनासाठी सर्व समाज घटकांनी पुढाकार घ्यावा – महेंद्र पवार

बालकामगार निर्मुलनासाठी सर्व समाज घटकांनी पुढाकार घ्यावा – महेंद्र पवार

0
36

गोंदिया,दि.11 : बालमजुरी ही एक गंभीर समस्या असून तीची पायमुळे ही समाजात खोलवर रुतलेली आहेत. बहुतांशी मुले बालमजुरीत गुंतल्याने त्यांचे शिक्षण, आरोग्य, विकास आणि भविष्यातील उदरनिर्वाह यांवर गंभीर परिणाम होत आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमजुरीचे समुळ नष्ट करण्यासाठी व बालमजुरी निर्मुलनासाठी स्वयंसेवी संस्था तसेच सर्व समाज घटकांनी पुढाकार घेवून समन्वयाने काम करावे. असे मत निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये बालकामगार जनजागृती मोहिमेच्या उद्देशाने 7 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात बालकामगार जनजागृती अभियानाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे, नमाद महाविद्यालयाचे प्राध्यापक रुतु तुरकर, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर उपस्थित होते.प्रास्ताविकातून गुणवंत पंधरे यांनी संपूर्ण अभियानाची उपस्थितांना माहिती दिली. तसेच प्रकल्पाअंतर्गत बालकामगार मुलांना कोणत्या सोयी सुविधा तसेच यांचेसाठी राबविण्यात येणारे कार्यक्रमाची व राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची माहिती देण्यात आली. तसेच बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरीता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

रुतु तुरकर म्हणाले, लहान मुलांना कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. ही बाब सर्वांच्या लक्षात येणे आवश्यक आहे असे सांगितले. डॉ.सविता बेदरकर यांनी बालकामगार विषयावरती व बालकामगार प्रथा दूर करण्याकरीता प्रत्येकांनी आपली जबाबदारी म्हणून कार्य करावे असे सांगितले.7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या बालकामगार जनजागृती मोहिमेअंतर्गत विट भट्टी, हॉटेल व आस्थापना मालकांकडून बालकामगार कामावर न ठेवण्याबाबतची हमी पत्रे लिहून घेण्यात येणार आहेत. दुकाने आस्थापनामध्ये बालकामगार काम करीत नाही असे स्टिकर चिकटवले जाणार आहेत. स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या मदतीने बालकामगार बहुल क्षेत्रात बालकामगार विषयी पालकांचे प्रबोधन केले जाणार आहे. यानुसार विट भट्ट्यांची तपासणी, आस्थापना व उद्योग मालक यांची सभा व त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय पथनाट्य, प्रचारफेरी, प्रभातफेरी, बालकामगार विषयी पत्रके रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात वाटली जाणार आहेत. बालकामगार या विषयावरती चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा तसेच स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्‍यात येणार आहे.

संचालन प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी यांनी केले, उपस्थितांचे आभार कार्यक्रम व्यवस्थापक नितीन डबरे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, नगरपरिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सामाजिक न्याय विभाग, जिल्हा महिला बाल विकास तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांचे कार्यालयातील कर्मचारी तसेच सहाय्यक कामगार आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभाग येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शेवटी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.