सडक अर्जुनी,दि.19:- तालुक्यातील दोडके/जा येथे आज 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम अंतर्गत उर्वरीत असलेल्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नवीन शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयात सर्व लाभार्थ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा कक्षातील सल्लागार भागचंद्र रहांगडाले यांनी शौचालय बांधकामाचे फायदे, गावांत शाश्वत स्वच्छता तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच विजय सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नूतन कुमार मंडारे, गटसमन्वयक राधेश्याम राऊत, ग्रामसेवक कसारे यांच्यासह गावातील नागरिक तसेच शौचालय बांधकाम करणारे लाभार्थी उपस्थित होते. यावेळी जनाबाई जयराम शिवणकर यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. उर्वरीत लाभार्थ्यांनी डिसेंबर च्या पहिल्या आठवड्यात शौचालय बांधकाम पूर्ण करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या.




