जिल्हयातील पदवीधर मतदार नोंदणी वाढविणे गरजेचे : सुधाकर कुळमेथे प्र.जिल्हाधिकारी
गडचिरोली,दि.19 : पदवीधर मतदारांच्या नोंदणीमध्ये दिनांक 9 डिसेंबर पर्यंत नोंदणी करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यानुसार गडचिरोली जिल्हयातील मतदारांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी बैठकीत सूचना दिल्या. जिल्हयात आत्तापर्यंत 6684 पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. मतदार नोंदणीत वाढ करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकी दरम्यान ते बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यातील पात्र पदवीधर मतदारांनी फॉर्म 18 भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावे असे आवाहन यावेळी प्र.जिल्हाधिकारी यांनी केले आहे. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना निळ-ठुबे व जिल्हयातील विविध प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
नोंदणीसाठी तालुक्याच्या तहसील कार्यालयात किंवा जिल्ह्याच्या निवडणूक शाखेत फॉर्म 18 उपलब्ध आहेत, ते प्राप्त करून पदवीधरांनी भरून आपल्या मतदार नोंदणीसाठी त्यापैकी एका कार्यालयात सादर करावा. सदर मतदार यादीत नोंदणी करण्याकरीता पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य अर्हता धारण केलेली असेल, अशी प्रत्येक व्यक्ती पात्र असेल. मतदार नोंदणीसाठी आवश्यक पदवी परिक्षा 1 नोव्हेंबर 2019 पुर्वी किमान ३ वर्ष आधी विद्यापीठ पदवी किंवा समतुल्य पदवी धारण केलेली असावी. त्यांनी नमुना 18 सोबत पदवी प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या स्व साक्षांकित प्रती जोडाव्यात. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर असा असणार आहे. तर 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
ही मतदार यादी महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाची असून प्रत्येक पदवीधर निवडणुकीआधी नव्याने तयार करावी लागते. यापूर्वी मतदार नोंदणी केलेल्या सर्व पदवीधर मतदारांनी पुन्हा यासाठी नोंदणी करणे आवश्यक असते असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी सांगितले. पदवीधारक व्यक्तिंनी आपले नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म 18 भरून आवश्यक कागदपत्रे जोडून संबंधित तहसील कार्यालय किंवा जिल्हा स्तरावर निवडणूक शाखेत दिनांक 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत जमा करावा.
पदवीधर नागरीकांना पदवीधर मतदार नोंदणी करून घेण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. पदवीधर मतदान प्रक्रियाही सर्वसाधारण निवडणूकीसारखीच महत्वाची असल्याने जास्तीत जास्त नोंदणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले. तसेच प्रशासनातील उपस्थित सर्व विभाग प्रमुखांना कार्यालयातील पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी उद्दीष्ट दिले आहे. कार्यालयातील प्रत्येक पदवीधर अधिकारी कर्मचारी यांना आपली नोंदणी करण्यासाठी विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावेत अशा सुचना बैठकी दरम्यान देण्यात आल्या.





