
गडचिरोली,दि.20: जिल्ह्यात चामोर्शी, अहेरी, सिरोंचा, मूलचेरा या भागात कापसाची लागवड होत असून जवळपास 15 हजार 49 एकर वर कापूस पीक घेतले जाते. तसेच दिवसेंदिवस कापूस पिकाचे क्षेत्र वाढत असल्याने गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनावर लक्ष देणे महत्वाचे आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडयात/ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरासरी 29 ते 300 से. तापमान असताना सामान्यत: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. परंतू यावर्षी पावसाचा हंगाम वाढल्यामुळे व वरील पोषक वातावरण सध्या असल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग जमिनीत असलेल्या कोषावस्थेमधुन बाहेर येत आहेत. हीच परिस्थिती सर्वदूर शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये आढळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र सध्या कोषातून बाहेर निघालेल्या पतंगांचे मिलन होऊन त्यांनी अंडी टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी याकिडीचा प्रादुर्भाव ज्या कपाशीला हिरवी बोंडे व पात्या आहेत अशा ठिकाणी दिसून येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी बंधुंनी उपाय योजना करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. कापूस पिकात त्वरीत किमान एकरी दोन फेरोमन सापळे लावून त्यामध्ये सतत तीन दिवस सात ते आठ पतंग आढळल्यास 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 25 मिली/10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. बोंडे/पात्या/फुले यामध्ये प्रादुर्भाव 5 ते 10 टक्क्यांपर्यंत आढळून आल्यास इंडोक्झाकार्ब 15.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा थायोडिकार्ब 75 टक्के भुकटी 20 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन 4.9 सीएस, 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव 10 टक्के पेक्षा जास्त आढळून आल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार 4 ग्रॅम किंवा बाजारात उपलब्ध असलेली मिश्र किटकनाशके जसे, प्रोफेनोफॉस 40 टक्के अ सायपरमेथ्रीन 4 टक्के 20 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 1 अ ट्रायझोफॉस 35 टक्के प्रवाही 12.50 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 अ सायपरमेथ्रीन 5 टक्के 20 मिली प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. शेतकरी बंधुंनी पिकाचे नियमित निरिक्षण करुन कामगंध सापळ्यामधील पतंगाची संख्या/प्रादुर्भाव तसेच सध्याच्या कापूस पिकाच्या वाढलेल्या हंगामामध्ये कापूस पिकाची संपूर्ण वेचणी झाल्यानंतर (एक ते दिड महिन्यामध्ये) कापसावर असलेली बोंडाची संख्या व अपेक्षीत उत्पन्न यांचा अंदाज घेऊनच कीड व्यवस्थापनाची वरील प्रमाणे उपाय योजना करावी. सरसकट सर्व शेतकरी बंधुंनी कीड व्यवस्थापनाची उपाय योजना करु नये. डिसेंबर 2019 नंतर कापूस पीक पूर्णत: काढून टाकावे. कापूस फरदड घेण्याचा मोह टाळावा जेणेकरुन, किडीचे जीवनचक्र खंडीत होऊन येणाऱ्या पुढील खरीप हंगामामध्ये या किडीचा प्रतिबंध करण्यास मदत होईल असे नारायण शिसोदे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.




