नागपूर,दि.23ः जिल्ह्यातील शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जी मदत जाहीर करण्यात आली, ती अत्यंत कमी आहे. यातून शेतकर्यांचा साधा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. यामुळे शेतकर्यांना वाढीव मदत करावी, या मागणीचे राज्यपालांना निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत आमदार अनिल देशमुख यांनी गुरुवारी (२१ नोव्हेंबर) दिले.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील कापूस सोयाबीन धान पिकाला संत्रा व मोसंबी या फळपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व शेतकर्यांसोबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: नागपूर जिल्ह्यातील शेतकर्यांच्या बांधावर गेले होते. यावेळी आम्हाला भरीव मदत मिळावी, अशी मागणी शेतकर्यांनी त्यांच्याकडे केली होती. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीसाठी नागपूर जिल्ह्यात केवळ १३ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. प्रत्यक्ष नुकसान लक्षात घेता देण्यात आलेली मदत ही अत्यंत कमी आहे. शिवाय आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊनसुद्धा शेतकर्यांच्या हाती काहीच येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचेसुद्धा देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या माध्यमांतून नुकसानग्रस्त पिकांसाठी आठ हजार रुपये प्रति हेक्टर व फळबागांसाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर अशी दोन हेक्टरपयर्ंत मदत जाहीर करण्यात आली. परंतु, ही मदत कमी आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन शेतकर्यांना जास्तीत जास्त मदत करण्याची मागणी केली आहे. त्याच धर्तीवर राज्यपालांनीसुद्धा केंद्राकडे अशी मागणी करावी, असे सुद्धा अनिल देशमुख यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
शिष्टमंडळात आ. प्रकाश गजभिये, राहुल देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, बंडोपंत उमरकर, सतीश शिंदे, ईश्वर बाळबुधे, बाबा शेळके, उज्ज्वला बोढारे, राजू राऊत, किशोर चौधरी, अविनाश गोतमारे, किशोर बेलसरे, दीपक मोहिते, अनिल साठवणे, नंदलाल मोवाडे, गणेश पानतावणे, मनीष फुके, रूद्रांगण चव्हाण, उदयन बन्सोड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.





