
गडचिरोली,दि.30ः-नक्षलवाद्यांकडून २ ते ८ डिसेंबर दरम्यान पीएलजी नक्षल सप्ताह पाळण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी भामरागड अंतर्गत येणार्या पोलीस मदत केंद्रातील धोडराज हद्दीतील मेडपल्ली व हिंदेवाडा या ठिकाणी सप्ताह पाळण्याबाबत नागरिकांना आवाहन करणारे बॅनल लावून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. परंतु नक्षल्यांचा हा प्रयत्न धोडराज पंचक्रोशीतील नागरिकांनी हाणून पाडत लावलेले नक्षल बॅनर काढून त्याची होळी करून सप्ताहाला प्रखर विरोध दर्शविला. यावेळी नागरिकांनी ‘नक्षलवाद मुर्दाबाद, पोलीस प्रशासन जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या.
गडचिरोली पोलीस दल आमच्यासाठी नेहमीच जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, शांती मेळावे आदी कार्यक्रम राबवून आम्हा आदिवासी बांधवांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करीत असतात. याउलट नक्षलवादी निष्पाप नागरिकांची हत्या करून समाजामध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच बरोबर आमच्यापर्यंत सोयी-सुविधा पोहचू नये यासाठी सप्ताहाच्या नावाखाली रस्त्यावर झाडे पाडून आमचे जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करीत असतात. या नक्षलवाद्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही गावकर्यांनी एकत्र येवून नक्षल सप्ताहाला प्रखर विरोध दर्शवित नक्षल्यांनी लावलेल्या बॅनरची होळी करीत असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले.
लोकशाही व संविधान न मानणारे नक्षलवादी सप्ताहाच्या नावाखाली स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु थोडराज येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नक्षल सप्ताहाला विरोध करण्याबरोबरच नक्षली बॅनरची होळी केली. याबाबत गडचिरोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी धोडराज पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.





