30.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home क्रीडा सामाजिक बांधिलकीतून दिव्यांगाच्या पाठीशी उभे रहा – आ. नरेंद्र भोंडेकर

सामाजिक बांधिलकीतून दिव्यांगाच्या पाठीशी उभे रहा – आ. नरेंद्र भोंडेकर

0
65

Ø  विकासासाठी निधी आणणार

Ø  दिव्यांग संस्था सक्षम करणार

Ø  दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

भंडारा( जिमाका ), दि,3:- प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपल्या घटनेने दिला आहे. व्यक्ती हा समाजाचा घटक असून त्यामध्ये भेदभाव करता कामा नये, दिव्यांग व्यक्तीसुध्दा आपल्या समाजाचे समान घटक असून दिव्यांग विकासासाठी व त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने दिव्यांगाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय व  समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून आयोजित  दिव्यांग विशेष शाळा व कर्मशाळामधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप होते.

अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, समाज कल्याण सभापती रेखा वासनिक, शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप शिंदे, युवा समन्वयक नेहरु युवा केंद्र हितेंद्र वैद्य सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, समाज कल्याण समिती सदस्य नेपाल रंगारी व श्रीमती बिंदू कोचे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.

दिव्यांग विद्यार्थ्याच्या धाव स्पर्धेस हिरवी झेंडी दाखवून आमदार नरेंद्र भोंडेकर व प्रमुख पाहुण्यांनी क्रीडा स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी बोलतांना नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, दिव्यांग व्यक्तीच्या विकासासाठी शासनाने 900 कोटीची आर्थिंक तरतूद केली आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी शासन कटिबध्द असून दिव्यांग व्यक्तीच्या सर्वांगिण विकासासाठी हा निधी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये वाढ करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेकडे लक्ष केंद्रीत करावे, असे सांगून भोंडेकर म्हणाले की, आजच्या क्रीडा स्पर्धेतून खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकावे.blank

दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजाने बदलण्याची गरज असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींना सहानुभूतीची गरज असून त्यांना माणूस म्हणून वागवावे, अशी आपेक्षा आहे. शासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याकडे येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींचे प्रश्न व समस्या प्राधान्याने मार्गी लावाव्यात. दिव्यांगासाठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ थेट दिव्यांगापर्यंत जावून दयावा, तरच आपण आपले कर्तव्य पार पाडले असे होईल.

भंडारा जिल्हयात 21 दिव्यांग शाळा असून एक अंध शाळा आहे, या ठिकाणी चारशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी आज क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इतर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये असणारे प्रत्येक गुण दिव्यांग विद्यार्थ्यांत असून ते कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत. त्याची गुणवत्ता राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला असल्याचे आशा कवाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अप्पर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, सभापती रेखा वासनिक, धनेद्र तुरकर व नेपाल रंगारी यांची यावेळी भाषणे झाली. कार्यक्रमाची सुरुवात लुई ब्रेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आल्या असून 4 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता स्पर्धेचा समारोप व बक्षिस वितरण होणार आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा परिषद भंडारा यांच्या अधिनस्त कार्यरत अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित अपंग शाळा व कर्मशाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थिते होते.