26.3 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home क्रीडा श्रीजीत पाटील व विहान लंजे यांचे जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

श्रीजीत पाटील व विहान लंजे यांचे जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद

0
6

गोंदियाच्या आठ बुद्धिबळपटूंची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड
गोंदिया, २९ जुलै-डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन व राधाबाई बहेकार नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जुलै रोजी शहरातील रामदेव देवरा सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गोंदियाच्या बुद्धिबळपटूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. हायस्कूल गटात श्रीजीत पाटील तर प्राथमिक गटात विहान लंजे यांनी विजेतेपद पटकावले.

हायस्कूल गटात श्रीजीत पाटील याने प्रथम क्रमांक मिळवून रोख २,००० रुपये, ट्रॉफी व मानचिन्हाचा मानकरी ठरला. कनक बागडे द्वितीय, अंबदास मोहतुरे तृतीय, देवेश पाऊलझगडे चौथा तर त्रिरल धामगाये पाचव्या क्रमांकावर राहिले.प्राथमिक गटात विहान लंजे याने प्रथम क्रमांक मिळवत रोख १,००० रुपये व ट्रॉफीवर नाव कोरले. भव्य अग्रवाल द्वितीय, अर्नव मिश्रा तृतीय, शिवांश गुरुनुले चौथा आणि तनस्क गोयल पाचव्या क्रमांकावर राहिले.

वयोगटनिहाय स्पर्धेत ८ वर्षांखालील मुलांमध्ये विहान तहिलियानी व मुलींमध्ये कियारा सिद्दरेड्डी, ११ वर्षांखालील मुलांमध्ये तनीष चुटूटनी तर मुलींमध्ये आराध्या, तसेच १३ वर्षांखालील मुलांमध्ये अक्षत गोयल व मुलींमध्ये आरोही जैन यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गोंदिया जिल्ह्यातील श्रीजीत पाटील, भव्य अग्रवाल, अभिषेक मनगाटे, विष्णू गुप्ता तसेच यशा फर्निडिस, उर्वी परमार, सांची जांभुळकर आणि ख्याती शुक्ला या आठ बुद्धिबळपटूंची महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना नगराध्यक्ष सचिन शेंडे, संगीता अशोक गुप्ता, पियुष अग्रवाल, शिखा पिपलेवार, अॅड. गायत्री पोपट, आर. के. मिश्रा यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल दवे यांनी भूषविले. स्पर्धेचे संयोजन गोंदिया डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनने केले. मुकेश बाराई यांनी सूत्रसंचालन, तर आभार नियाज शेख यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्याम अग्रवाल, डी. बी. चौरे, सुधांशु गायधने, राजकुमार बागडे, चिराग हट्टीमारे, आयुष चौरे, प्रभाकर पालांदूरकर यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेत जिल्हाभरातील सुमारे १७० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.