
गोंदिया,दि.05ः-सर्व सामान्यांना चिंतन करायला लावेल अश्या प्रतिभा व सुप्त गुण दिव्यांग मुलांमध्ये असतात. फक्त त्याला शोधून व प्रेरणा देऊन उजेडात आणणे महत्वाचे असून या करिता गोंदिया जिल्ह्यात दिव्यांग मुलांकरिता सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक वरदान ठरत असल्याची माहिती विभागाचे जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी दिली आहे.
नुकताच 3 डिसेंबर ला जागतिक दिव्यांग दिन संपूर्ण जिल्ह्यातील शाळेत साजरा करण्यात आला. या निमित्य दिनांक 3 ते 9 डिसेंम्बर 2019 या कालावधी मध्ये दिव्यांग जागरूकता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्य विविध कार्यक्रम विशेष शिक्षकांच्या मार्फत शिक्षकांद्वारा राबविण्यात येत आहेत.
सर्व सामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांना समाजात मानाचे स्थान मिळावे, त्याना दर्जेदार शिक्षण मिळावे , शालेय व सामाजिक जीवनात दिव्यांगत्व अडथळा म्हणून समोर येऊ नये या करीता सर्व शिक्षा अभियानाच्या दिव्यांग विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात. यात तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करून विविध उपकरणे, शाळेत येण्याकरिता प्रवास व मदतनीस भत्ता, अंध मुलांना वाचणीक व लेखनिक, निरंतर थेरपी, गरजेनुसार शस्त्रक्रिया, उन्हाळी सुट्यांमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम व विशेष शिक्षकांच्या मार्फत अध्ययन अध्यपान करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न विभागाच्या वतीने यशस्वीपणे सुरू आहे.
याच धर्तीवर 3 डिसेंम्बर जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये 3 ते 9 डिसेंम्बर हा जागरूकता सप्ताह साजरा करण्यात येत असून या निमित्य विविध क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, तज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम राबवून जिल्ह्यातील दिव्यांग ”हम भी किसींसे कम नही”! ची चुणूक दाखवून देत आहेत.या करिता जिल्ह्यातील शैक्षणिक दृष्टया आखण्यात आलेले 89 केंद्र 42 विशेष शिक्षक व 15 समावेशीत शिक्षण तज्ञ यांना समान वाटणी करून देण्यात आली असून यासाठी सर्व यंत्रणा अथक परिश्रम घेत आहे.





