24.5 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ  ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला अंतर्गत तेरावे सत्र यशस्वीरित्या संपन्न

 ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला अंतर्गत तेरावे सत्र यशस्वीरित्या संपन्न

0
43

तिरोडा,दि.9: केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत नोकर भरतीच्या अनुषंगाने जाहिराती प्रकाशित करण्यात येतात. गोंदिया जिल्हा हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भागात मोडत असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध विभागाच्या नोकर भरतीच्या जाहिरातीच्या अनुषंगाने विस्तृत माहिती नसते. त्याकरीता विद्यार्थ्यांना परीक्षांची  माहिती, विविध विभागाच्या/पदांच्या अनुषंगाने परीक्षेची तयारी कशी करावी, त्याकरीता आवश्यक बाबी इत्यादी विषयी तज्ज्ञ वक्त्यांमार्फत मार्गदर्शन करणे व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ज्ञ वक्ते/अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार सदर व्याख्यानमालेच्या तेराव्या सत्राचे आयोजन 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता छोटाभाई जवेरभाई पटेल महाविद्यालय, तिरोडा येथे करण्यात आले होते. यावेळी तिरोडा उपविभागीय अधिकारी गंगागर तळपादे, न.प.मुख्याधिकारी विजय देशमुख यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती.

यावेळी गंगाधर तळपादे म्हणाले, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या तसेच राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यापूर्वी विद्यार्थी जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचे अभ्यासक्रमाबाबत अगोदर सविस्तर माहिती घेवून विषयानुसार अभ्यासाचे नियोजन करावे. या परीक्षांची तयारी करतांना विद्यार्थ्यांनी मानसिक कणखरता अंगीकारणे महत्वाचे असल्याबाबत तसेच या परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची वशीलेबाजी चालत नसल्याबाबत विद्यार्थ्यांना सांगून ऑनलाईन प्रणालीमार्फत देखील या परीक्षांसाठी आवश्यक असणारे सर्व स्त्रोत उपलब्ध असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विजय देशमुख म्हणाले, स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना प्रयत्नांमध्ये सातत्य व जिद्द असल्यास यश मिळविणे कठीण नाही असे सांगितले. विदर्भामध्ये या परीक्षांबाबत जागरुकता नसल्याने तसेच योग्य वयात या क्षेत्राकडे न वळल्याने कुठेतरी आपला विद्यार्थी मागे पडत असल्याबाबत मुख्याधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. 11 व 12 वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून योग्य दिशेने वाटचाल केल्यास आपल्या भागातील विद्यार्थ्यांना सुध्दा या परीक्षांमध्ये यश मिळू शकते असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

या व्याख्यानमालेस छोटाभाई जवेरभाई पटेल महाविद्यालय तिरोडा येथील विद्यार्थी, शहिद मिश्रा महाविद्यालयातील विद्यार्थी, मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह तिरोडा येथील विद्यार्थीनी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अंकेश केदार यांनी मानले. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा व्याख्यानमालेचा पुढील सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.