भंडारा, दि.10 : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2019 मधील पीक विम्याच्या रकमेचे वाटप 12 डिसेंबर रोजी लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबई येथे विमा कंपनीला दिले. विधानभवनात भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेच्या वितरणाबाबत अध्यक्षांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे संचालक नारायण शिसोदे, जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, विमा कंपन्यांचे अधिकारी आदी उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातील एक लाख 61 हजार 343 धान उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यांनी 5 कोटी 43 लाख रुपये विम्याच्या हप्त्यापोटी जमा केले. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 67 कोटी 86 लाख रुपये मिळणार आहेत. प्रति हेक्टरी ही रक्कम 9062 रुपये असेल अशी माहिती विमा कंपनीच्या प्रतिनिधीने यावेळी दिली.ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर जमा करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करून जाहीर मेळावा घेण्यात यावा, त्यात शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत वाटप करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये विमा वितरणासंदर्भात साशंकता राहणार नाही, असे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रूपयांचे अनुदान मिळणार
भंडारा, दि.10:– राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.सन 2019-20 या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2019-20 मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.





