25.2 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम सुरू करा

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम सुरू करा

0
31

गडचिरोली,दि,15ः जिल्ह्यातील एकमेव वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग मंजूर होऊन ८ वर्षाचा कालावधी लोटला. २0१५ मध्ये या मार्गासाठी रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाली. मात्र, ४ वर्षाचा कालावधी लोटूनही जमीन अधिग्रहण ची कार्यवाही पूर्ण झालेली नाही तसेच वनविभागाची अडचण सुटण्यास विलंब लागल्याने या मार्गाचे काम अजूनही सुरू होऊ शकले नाही. परिणामी मंजूर झालेल्या रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्ये ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास’ या उदात्त हेतूने काम करणार्‍या केंद्र शासनाविरुद्ध असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे वडसा- गडचिरोली रेल्वे मागार्साठी जमीन अधिग्रहनाची कार्यवाही यथाशिग्र पूर्ण करण्याचे आदेश निर्गमित करून रेल्वे मार्गाचे काम तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी खा. अशोक नेते यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.
खासदार अशोक नेते यांनी १३ डिसेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रश्नांबाबत यांच्याशी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान खा. नेते यांनी रेल्वे मंत्र्यांना सांगितले की, सदर रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण झाल्यास जिल्ह्यात व लोकसभा क्षेत्रात नवनवीन लहान-मोठे उद्योगधंदे, कारखाने येतील व येथील हजारो बेरोजगार युवकांना रोजगार मिळेल व ते राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होतील, असे सांगितले. तसेच क्षेत्रातील इतर रेल्वे च्या समस्यांचे निवेदन सादर केले.
तसेच नागभीड-नागपूर या ब्राडगेज मार्गाच्या कामाला गती देऊन नागभीड व आमगाव जि. गोंदिया येथे सिकंदराबाद- दरभंगा एक्स्प्रेस चा थांबा मंजूर करून गोंदिया ते डोंगरगड दरम्यान दुपारच्या सुमारास डेमो रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी ही खा. अशोक नेते यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यात रेल्वेचे जाळे निर्माण झाल्यास पूर्ण लोकसभा क्षेत्राचा झपाट्याने विकास होऊन जिल्ह्यातील गरीब, कामगार, शेतमजूर वर्गाच्या हाताला काम मिळेल व नक्षलवादामुळे वाम मार्गाला वळलेला सुशिक्षित बेरोजगार युवकाना रोजगाराची संधी निर्माण होईल. यातून आर्थिक परिस्थिती सुधारुन देश विकासासाठी आपले योगदान देतील. जिल्हा विकासाचा दुवा ठरणार्‍या वडसा- गडचिरोली या ५२.३६ किमी रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहणाची कार्यवाही यथाशिग्र पूर्ण करण्याच्या सूचना आपल्या स्तरावर देऊन मार्गाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी खा. नेते यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे रेटून धरली.
खा. नेते यांच्या भेटीदरम्यान रेल्वेमंत्री गोयल यांनी वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासंदर्भात आपण संबंधित यंत्रणेला सूचना करणार असून, क्षेत्रातील रेल्वेच्या इतरही समस्या लवकरचं सोडविण्याचे आश्‍वासन यावेळी रेल्वेमंत्र्यांनी खा. अशोक नेते यांना दिले.