23.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Top News ‘मी सावरकर’ टोप्या घालून भाजप आमदारांची निदर्शने

‘मी सावरकर’ टोप्या घालून भाजप आमदारांची निदर्शने

0
38

नागपूर,दि.16- आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या मुद्यांवरुन हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, आक्रमक पवित्रा भाजपच्या आमदारांनी सभागृहात ‘मी सावरकर’चा नावाच्या टोप्या घालून प्रवेश केला. यावेळी सर्व आमदार विधानसभेबाहेर “राहुल गांधीनी माफी मागावी…उद्धव ठाकरे होशमे आओ…इंधिरा गांधींच्या धिक्कार असो…” अशा घोषणा देत आहेत. पुढील सहा दिवस चालणाऱ्या अधिवेशनात ऐन थंडीत वातावरण तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. ज्यांनी सावरकरांचा अपमान केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या चहापानाला जाणार नाही, असे सांगत विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. तर नागरिकत्व कायदा हाच मुळात सावरकरांच्या विचारसरणीविरुद्ध असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा आमदारांनी याच मुद्द्यावरुन गदारोळ घातला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सावकरांविषयीच्या विधानावरून भाजपने शिवसेनेची कोंडी केली आहे. सावरकरांचा अपमान शिवसेना सत्तेसाठी सहन करीत असल्याचा हल्लाबोलही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  दरम्यान, केवळ सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सावरकरांच्या अपमानावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधक अत्यंत आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर, दुसरीकडे जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा भाजपचा डाव असल्याची भूमिका घेत, सत्तारूढ महाविकास आघाडी भाजपला जोरदार प्रत्युत्तर देत आहे.

blank