
मुंबई(वृत्तसंस्था)दि.17: “भाजपाचे आयटी सेलच खरी तुकडे तुकडे गँग आहे,” अशी बोचरी टीका अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरामध्ये सुरु असणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेणुका यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिक विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये रविवारी उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला आहे. सोमवारी देशभरातील अनेक विद्यापीठांमधील विद्यार्थी पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. देशातील या अशांततेसाठी भाजपाचे आयटी सेल जबाबदार असल्याचा टीका रेणुका शहाणे यांनी ट्विटवरुन केली आहे.
रेणुका शहाणे ट्विट करत म्हणाल्या की, सर आधी सामान्य जनतेला तुमच्या आयटी सेलच्या ट्विटर हँडलपासून दूर राहण्याची विनंती करा. कारण त्यांच्याकडूनचं अधिकाधिक अफवा, खोटी माहिती पसरवण्यात येत असल्याने देशाच्या बंधुत्वाला, शांततेला आणि एकतेला धोका निर्माण होत आहे. तुमची आयटी सेल खरी तुकडे तुकडे गँग आहे. भाजपाच्या आयटी सेलला द्वेष पसरवण्यापासून थांबवा असे ट्विट करत रेणुका शहाणे यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे
नरेंद्र मोदींनी ट्विट करुन नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन हिंसक आंदोलन करणे हे दुर्दैवी आणि अत्यंत त्रासदायक आहे. वादविवाद, चर्चा आणि मतभेद हे आपल्या लोकशाहीचा भाग आहे. पण कधीही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन सर्वसामान्यांच्या जीवनात अडथळा निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाही असे त्यांनी सांगितले होते. तसेच आपण सर्वांनी एकत्रितपणे भारताच्या विकासासाठी आणि प्रत्येक भारतीय, विशेषतः गरीब, वंचित आणि शोषितांच्या सक्षमीकरणासाठी काम करणं ही काळाची गरज आहे. आम्ही स्वार्थासाठी स्वारस्य असलेल्या गटांना आमचे विभाजन करण्यास आणि त्रास निर्माण करण्यास थारा देऊ शकत नाही. शांतता, ऐक्य आणि बंधुता टिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा व इतर खोटेपणापासून दूर रहावे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले होते.संसदेने गेल्या आठवड्यात मंजूर केलेल्या सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील आंदोलनाने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना देशाच्या राजधानीतही या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर आता लखनऊ, मुंबईसह देशभरातील विविध भागात आंदोलन सुरु आहे.





