Ø सुलभ लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासनासाठी प्रणाली उपयुक्त
Ø जनतेसाठी स्वतंत्र पोर्टल
भंडारा,दि. 19 :- आय-पास या संगणकीय प्रणालीच्या अंमलबजावणी अंतर्गत चालु आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या कामांची माहितीची नोंद करण्यात येणार आहे. तद्नंतर पुढील वर्षापासून केवळ या संगणकीय प्रणालीद्वारेच कामकाज करणे अनिवार्य राहणार आहे. प्रणालीचे नियंत्रण राज्यस्तरावरुन करण्यात येणार आहे. माहिती नोंदविण्याचे कामात जिल्हयातील कोणताही विभाग व यंत्रणा मागे राहणार याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी कार्यान्विन यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आय-पास संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, उपवन संरक्षक विवेक होशिंग व जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व यंत्रणांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते.आय-पास या प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समिती कार्यालय व जिल्हयातील सर्व कार्यान्विन यंत्रणा जाडल्या जाणार असून जनतेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील कामकाज संगणीकृत होवून सुलभ लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान प्रशासन होण्यास मत होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकरीता राज्य शासनाकडून आय-पास ही संगणक प्रणाली विकसीत केलेली आहे. या प्रणालीचे प्रशिक्षण जिल्हा नियोजन समिती कार्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आले आहे. शासनाकरीता आय-पास ही प्रणाली विकसित करणाऱ्या मे. ई.एस.डी.एस. सॉफ्टवेअर सोलूशन प्रा.लि. नाशिक या कपंनीचे संगणकतज्ञ व अभियंता वैभव विधाते आणि रोहीत पगारे यांनी सादरीकरणाद्वारे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा नियोजन समिती कार्यालयाअंतर्गत वार्षिक योजना, खासदार व आमदार निधी, पर्यटन, मुद्रा बँक, नक्षलग्रस्त भागाचा विकास इत्यादी विविध योजनांद्वारे जिल्हयातील विकास कामांना प्रशासकीय मंजूरी प्रदान करुन कामांकरीता निधीचे वितरण करण्याची कामे करण्यात येतात. जिल्हा नियोजन समिती कार्यालयातील टपालाचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून काम पूर्ण होईपर्यंतची अद्यावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन व विविध स्तरांवर डॅशबोर्डस इत्यादी बाबींचा समावेश या संगणकीय प्रणालीत करण्यात आला आहे.





