गोरेगाव (दि. २९ जुलै): शेतात काम करणाऱ्या बळीराजावर एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या संकटांनी कुऱ्हाड चालवल्याने गोरेगाव तालुका हादरून गेला आहे. बुधवारी सकाळी घुमरा, कालपाथरी व पालेवाडा शिवारात शेतीची कामे करत असताना जंगली डुकरांच्या कळपाने अचानक हल्ला चढवून आठ ते नऊ शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. तर दुसऱ्या एका दुर्दैवी घटनेत नवाटोला येथे चंंद्रकुमार दिगबंर येडे(वय ३२) तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
रानडुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राधेश्याम संगो राऊत (४५, रा. कालपाथरी) यांना गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून, लालाजी बागडे, प्रदीप राऊत, धीरज बागडे, जितेंद्र गावराणे, शालू मेहराम, कुसुमबाई राखडे व इतर जखमींवर गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच भाजप युवा महामंत्री तथा माजी सभापती मनोज बोपचे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व कुटुंबीयांना धीर दिला.”केवळ पंचनामे करून वन विभागाने जबाबदारी टाळू नये. रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवून जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी,” अशी ठाम मागणी बोपचे यांनी केली आहे.





