भंडारा,दि. 19 :- जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटी समितीची बैठक जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस उपवनसंरक्षक विवेक होशिंग, पोलीस उपअधिक्षक श्री. गाडे समितीचे सदस्यसचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सतिश राजु, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुरेश कुंभरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत खालील विषयावर चर्चा करण्यात आली. प्राणी क्लेष प्रतिबंधासाठी जंगल भागातील गावात व तसेच बाजारात फ्लेक्सद्वारे प्रसिध्दी करणे, वनविभाग व पशुसंवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव जनजागृती पथकाच्या 12 गावातील जनजागृतीसोबत प्राणी क्लेषप्रतिबंधात्मक जनजागृती करण्यात येणार असून चित्रफितीद्वारे प्राणी हत्या प्रतिबंधाबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाद्वारे 10 गावात जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्हयाच्या सिमावर्ती भागातही जनजागृती करण्यात येणार आहे. गोशाळेमार्फत प्राणी क्लेष प्रतिबंधाबाबत जनजागृती करणे, गाय व गोमुत्र तयार करणे बाबत प्रशिक्षण, 31 डिसेंबर पर्यंत या सर्व बाबींचा छायाचित्रासह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
नगरपरिषद व पंचायत क्षेत्रात अँटी रॅबिज प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे, त्याबाबत नगर परिषद व पंचायतींना सूचना करणे, गाव बाजारात ही जनजागृती प्राधान्याने करावी, यासाठी नागझिरा अभयारण्याच्या प्रशासनाशी चर्चा करावी असे सांगण्यात आले. जिल्हयातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात उघडयावर मास विक्री बंद करणे, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे, दुर्गधीवर उपाययोजना करणे बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.




