42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ चिन्नोर तांदळाला मिळणार भौगोलिक मानांकन-खा.मेंढेची पत्रपरिषदेत माहिती

चिन्नोर तांदळाला मिळणार भौगोलिक मानांकन-खा.मेंढेची पत्रपरिषदेत माहिती

0
51

blank

भंडारा,दि.20ः- जिल्ह्यातील प्रसिद्ध चिन्नोर या तांदळाच्या वाणाला लवकरच भौगोलिक मानांकन (जिओग्रॉफिक इंडिकेशन) मिळणार असून या वाणाचे ब्रॅंडींग करुन हे तांदूळ देशभर पोहचविले जाणार आहे. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक बळ देण्यासाठी खा. सुनील मेंढे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पुढील खरीप हंगामापासून या वाणाची लागवड केली जाणार आहे.
भंडारा जिल्हा राईस सिटी म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. येथील तांदूळ हा ‘फाईन तांदूळ’ म्हणून ओळखला जात असून यासारखा तांदूळ देशात कुठेही मिळत नाही. परंतु, येथील शेतकर्‍यांच्या धानाला भाव मिळत नसल्याने दरवर्षी त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
चिन्नोर तांदळाला विशिष्ट सुगंध आणि चव आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शेतमालाचे ब्रॅंडींग करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खा. सुनील मेंढे यांनी या वाणाचे भौगोलिक मानांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणेरी पगडी, वायगाव हळद, बासमती तांदूळ, दाजिर्लिंग चहा, भिवापुरी मिरची आदी भौगोलिक मानांकन मिळविलेल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असून ही उत्पादने ज्या भागातील आहेत तेथील उत्पादकांना व शेतकर्‍यांना त्याचा प्रचंड लाभ झालेला आहे.
याबाबत माहिती देताना खा. सुनील मेंढे म्हणाले, महाराष्ट्रात अनेक भाताच्या जाती आहेत. ज्यात नैसर्गिकरित्या सुगंध आणि चव आहे. त्यापैकी पश्‍चिम महाराष्ट्रातील आंबेमोहर तांदूळ आणि आजरा घनसाळ या तांदळास भौगोलिक मानांकन मिळाले आहे. आता या शेतीजन्य पदार्थांना दुप्पट किंमत मिळाली आहे. ८0 टक्केपेक्षा जास्त ग्राहक सर्वसाधारण बाजारपेठेच्या ४0 टक्केपेक्षा अधिक किंमत द्यायला तयार आहेत. यासाठी पुण्यातील बौद्धीक संपदा आणि भौगोलिक मानांकन विषयाचे अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांचे सहकार्य घेणार असल्याचे ते म्हणाले.
चिन्नोर तांदळाची लागवड करण्यासाठी फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करुन त्यामार्फत शेतकर्‍यांचा गट तयार होणार आहे. या वाणाचे उत्पादन संपूर्ण ऑरगॅनिक पद्धतीने होणार आहे. चिन्नोर वाणाचे बॅंड्रींग झाल्यानंतर त्याला देशभरात बाजारपेठ उपलब्ध होऊन शेतकर्‍यांचा लाभ होणार आहे. याबाबत मागील आठवड्यात खा. मेंढे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानुसार जिल्हा कृषी विभागातर्फे जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव सादर करण्यात आला असून लवकरच त्यास मंजूरी मिळून पुढील खरीप हंगामापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले.

blank