
गोंदिया,दि.२२ : नागरिकता संशोधन अधिनियम २०१९ चा विरोध आणि पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग करून विद्यार्थी आणि प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज करत बंदुकीच्या गोळ्या झाडल्या. याचा विरोध करण्याच्या उद्देशाने संविधान मैत्री संघांतर्गत अवामे मुस्लीम, ओबीसी व्हीजे एनटी, एससी-एसटी, मायनॉरिटी वर्गाच्या वतीने (दि. २१) गोंदियातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर सभा घेवून शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढण्यात आली. दरम्यान उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. नागरिकता संशोधन विधेयकाला १२ डिसेंबर रोजी मंजूरी देण्यात आली. लोकसभेत या बिलाला मंजूरी मिळाली. मात्र राज्यसभेत विरोध असताना देखील मंजुरी देण्यात आली. सदर अधिनियम देशाला विभागणारा असून यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. देशाला जाती धर्मात विभागण्याचे काम या विधेयकाच्या माध्यमातून करण्याचा घाट शासनाने घातला आहे. संपूर्ण जगात भारताची सार्वभौम आणि सर्वधर्म समभाव असणारा देश म्हणून भारताला ओळखण्यात येतो. मात्र या अधिनियमामुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या विधेयकाच्या विरोधात पूर्वोत्तर राज्य आसाम, त्रिपूरा, मेघालय, पश्चीम बंगाल, तामिळनाडू, केरळ, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली राज्यांत मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळत आहे. फूट पाडा आणि राज्य करा, असा उद्देश या कायद्याच्या माध्यमातून समोर आला आहे. तातडीने हे अधिनियम रद्द करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढत शासनविरोधात घोषणा देण्यात आल्या. रॅलीत हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे, एआयएमएमचे गुड्डू हुसैनी,पुरुषोत्तम मोदी,ओबीसी संघर्ष कृती समितीचे सुनिल पटले, जाकीर अली, असईम कुरैशी, मोहसीन खान, मोहम्मद जावेद रजा, मिलींद गणवीर, अफजल शाह, अलीगूर रहमान, मो. सफी खान, मुजीब खान, फरहान गुलाटी, अकरम खान पठाण, मो. अनीस खान पठाण, परवेझ शेख, साहिल मंसुरी, मो. अलीन कुरैशी, खालीद पठाण, आसीफ सैय्यद, अहमद मनिहार, जलील खान, रिझवान खान, धुर्वास भोयर, प्रशांत डोंगरे आदींचा समावेश होता.





