सालेकसा,दि.25ःशहरातील स्मशानभूमी रस्त्यावरील जुने शवविच्छेदनगृह सध्या अंमली पदार्थ्यांच्या शौकिन तरुणांसाठी अड्डा बनला आहे. परिसरातील नागरिकांसाठी या असामाजिक तत्वांचा सामना करावा लागत असून जुने शवविच्छेदनगृह नष्ट करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यात बाबाटोली, निंबा, पिपरिया आदी परिसरात अवैधरित्या गांजा विक्री होत असून सालेकसा शहरातील तरुण मंडळी या अंमली पदार्थांचे सेवन करतांना दिसून येत आहे. अशा युवकांसाठी एम. बी. पटेल महाविद्यालयासमोर असलेले जुने शवविच्छेदनगृहाची इमारत मोक्याची व सुरक्षीत जागा ठरत आहे. रात्रीच्या वेळी गांजा ओढणार्या व दिवसा मद्यपींचा येथे वावर राहत असून इमारतीत बिडी, सिगारेट, दारुच्या रिकाम्या बाटल्यांचे साम्राज्य पाहायला मिळते. मात्र अशा असामाजिक तत्वांचा परिसरातील नागरिकांना सामना करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण राहते. त्यामुळे जुने शवविच्छेदनगृहाची इमारत पाडून अवैधरित्या गांजा विक्री करणार्या व्यक्तींवर कारवाई करावी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी रामटेके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ग्रामीण रुग्णालय परिसरात नवीन शवविच्छेदनगृह तयार झाल्यापासून आम्ही जुन्या इमारतीचा ताबा सोडला असून त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे त्यांनी सांगितले.





