32.7 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ केंद्र शासनाच्या योजनांचा खासदारांनी घेतला आढावा

केंद्र शासनाच्या योजनांचा खासदारांनी घेतला आढावा

0
29
????????????????????????????????????

Ø  घरकुल पूर्णत्वाला प्राधान्य द्या,Ø  घरकुलांसाठी रेती उपलब्ध करा
भंडारा,दि 4:- केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा खासदार सुनील मेंढे यांनी घेतला. 2022 पर्यंत सर्वांना घरकुल या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत घरकुलांचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. यासाठी केंद्र सरकारचा निधी कमी पडणार नाही असे, ते म्हणाले.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा जिल्हा परिषद सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार डॉ. परिणय फुके, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मनिषा कुरसंगे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

घरकुलांसाठी लागणारी रेती जवळच्या रेती घाटावरून देण्याच्या सुचना खासदारांनी केल्या. घरकुलांसाठी लागणारी पाच ब्रास पर्यंत रेती विना रायल्टी लाभार्थ्यांना देण्यात यावी असे शासनाचे निर्देश आहेत, या निर्देशांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.ज्या लाभार्थ्यांकडे घरकुलांसाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जागा घेण्यासाठी पन्नास हजार रुपये अनुदान देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत मध्ये योजनेचे फलक लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

झुडपी जंगलाच्या जागेत अतिक्रमण असलेल्या गावात अशी जागा एक हेक्टर पेक्षा कमी आहे व या जागेत 75 पेक्षा कमी झाड असल्यास नियमित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी सूचना आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली. या बैठकीत मागील सभेच्या इतिवृत्तावर चर्चा करून ते कायम करण्यात आले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण भंडारा जिल्हा ओडीएफ झाला असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत धारगाव, आंधळगाव, आमगाव, कातेबाम्हणी व मोहंगाव या ठिकाणी नवीन 33/11 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात योग्य दाबाचा विद्युत पुरवठा मिळण्याकरिता 100 केव्हीए क्षमतेचे 54 वितरण रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील 3765 लाभार्थ्यांना घरगुती वीज जोडण्या देण्यात आल्याचे वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत या वर्षात 5301 प्रकरणात 62.75 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. या बैठकीत खासदारांनी कर्ज वितरणाचा बँक निहाय आढावा घेतला. मुद्रा योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून बँकांनी मुद्रा योजनेत जास्तीत जास्त कर्ज वितरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बँकांनी या योजनेत कुणाचीही अडवणूक होता कामा नये असे ते म्हणाले. 50 हजारापर्यंत कुठल्याही लाभार्थ्यांना कागदपत्रे मागता काम नये, अशा सूचना त्यांनी केल्या.प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 1566 नवीन घरकुलांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहरामध्ये या योजनेत मोठ्या प्रमाणात काम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा शहरात 16 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांच्या घरकुलांसाठी नियोजन आवश्यक असल्याचे सांगून गती वाढवावी असे ते म्हणाले.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना, प्रधानमंत्री ग्राम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पेयजल योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, राष्ट्रीय भूमी अभिलेख व्यवस्थापन कार्यक्रम, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय स्वास्थ अभियान, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, मुद्रा योजना, डिजिटल इंडिया व पायाभूत सुविधा योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सदस्यांनी आपापल्या भागातील विविध प्रश्न व अडचणी या बैठकीत मांडल्या. या वर कार्यवाही करण्याच्या सूचना खासदारांनी दिल्या.