36.8 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ हक्कासाठी एल्गार, अस्मितेसाठी महासंगम!२९ जूनला साकोलीत कोहळी समाजाची विराट एकजूट

हक्कासाठी एल्गार, अस्मितेसाठी महासंगम!२९ जूनला साकोलीत कोहळी समाजाची विराट एकजूट

0
13

गोंदिया –कोहळी समाजाच्या हक्कांचा बुलंद आवाज, समाजाच्या अस्मितेचा स्वाभिमानी जागर आणि एकतेचे अभूतपूर्व दर्शन घडविणारा विराट समाज मेळावा येत्या सोमवार, २९ जून २०२६ रोजी साकोली येथे होत असून, संपूर्ण विदर्भातील कोहळी समाज या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होणार आहे. केंद्रीय कोहळी समाज विकास मंडळ, नागपूर आणि कोहळी पाटील संघर्ष मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या भव्य मेळाव्याने समाजात नवचैतन्य निर्माण केले असून, हक्क, एकता आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असल्याची भावना समाजबांधवांमध्ये व्यक्त होत आहे.

आज समाजासमोरील विविध प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी संघटित शक्तीची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर “भीक नको, हक्क हवा… कोहळी समाजाचा एकच दावा!” आणि “प्रथम समाज… नंतर पक्ष!” या स्वाभिमानी घोषणांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त केला जाणार आहे. समाजातील मतभेद विसरून एकदिलाने समाजहितासाठी उभे राहण्याचा संदेश या मेळाव्यातून दिला जाणार असून, हा मेळावा कोहळी समाजाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची चर्चा आहे.

भंडारा-गोंदिया, चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रासह साकोली, तुमसर, अर्जुनी मोरगाव, चिमूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील हजारो समाजबांधव, महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर व्यापक मंथन होणार असून, युवकांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणणे, महिलांचा सहभाग वाढविणे, समाजातील प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे आणि समाजहितासाठी एकसंघ दिशा निश्चित करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.

“कोहळी पाटील जागे व्हा… एकता, संघटन आणि विकास!” हा मुख्य संदेश घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात समाजाच्या भविष्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, विचारवंत आणि समाजनेत्यांच्या मार्गदर्शनातून भावी पिढीसाठी सक्षम, सुसंघटित आणि स्वाभिमानी समाज घडविण्याचा संकल्प यावेळी केला जाणार आहे.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय कोहळी समाज विकास मंडळ, नागपूर, कोहळी पाटील संघर्ष मंच आणि समस्त कोहळी पाटील समाज बांधवांनी व्यापक जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील सर्व कोहळी समाज बांधवांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या ऐक्याला बळ द्यावे, आपल्या हक्कांच्या लढ्याला सामर्थ्य द्यावे आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी या ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार व्हावे, असे भावनिक आवाहन आयोजकांनी केले आहे.समाजाच्या एकतेचा, स्वाभिमानाचा आणि प्रगतीचा नवा इतिहास घडविणारा हा मेळावा विदर्भातील कोहळी समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.