मुंबई,दि.07 : निसर्गाचे भरभरून देणे लाभलेला असा माळशेजघाट पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. पावसाळ्यात तर माळशेज घाट पर्यटकांनी फुलून जातो. अशा या माळशेज घाटात ‘पतंगबाजी’ करण्याची संधी मिळाली तर! तर पतंगबाजीचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असेल. अन्यथा कित्येकांचे माळशेज घाटात पतंग उडवण्याचे स्वप्नही असेल. तर हे स्वप्न पूर्ण करण्याची, हा अविस्मरणीय अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आता पतंगप्रेमींना मिळणार आहे.१० जानेवारीला माळशेज घाटात ‘पतंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले असून तीन दिवस चालणा-या या पतंग महोत्सवात मोठय़ा संख्येने पतंगप्रेमींनी आणि पर्यटकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी केले आहे.
मकर संक्रांतीला पतंगबाजी केली जाते. महाराष्ट्र, गुजरातसह देशातील अनेक राज्यांमध्ये या दिवशी पतंग उडवले जातात. त्यामुळे आता मकर संक्रात जवळ आली असून पतंगप्रेमींना नक्कीच पतंगबाजी करण्याचे वेध लागले असतील, काही तशी तयारीही सुरू केली असेल. घराच्या गच्चीवर, मैदानात पतंगबाजी करणा-या पतंगप्रेमींना माळशेज घाटात पतंगबाजी करण्याची संधी एमटीडीसीने उपलब्ध करून दिली आहे.मकर संक्रांतीचे औचित्य साधत १०, ११ आणि १२ जानेवारीदरम्यान एमटीडीसीने पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते ७ या वेळेत हा महोत्सव होणार असून यासाठी प्रति व्यक्ति केवळ ५० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. महोत्सवाच्या ठिकाणी पतंग, मांजा, इतर साहित्य खरेदीसाठी स्टॉलही लावण्यात येणार आहेत. तर पशु-पक्ष्यांना मांजाचा त्रास होऊ नये, यात पक्षी जखमी होऊ नयेत यादृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले आहे. त्यानुसार प्रतिबंधित मांजांचा वापर या महोत्सवात करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
हा पतंग महोत्सव आगळावेगळा ठरावा यासाठी या महोत्सवात विना मांजाचे पतंग, ड्रोन पतंगही समाविष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान हा असा आगळावेगळा महोत्सव पहिल्यांदाच होणार असून, या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही काळे यांनी व्यक्त केला आहे. माळशेज घाटाला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त करुन देण्यासाठी विविध उपक्रम एमटीडीसीकडून हाती घेण्यात आले आहेत. त्यातीलच एक उपक्रम म्हणून हा पतंग महोत्सव भरवण्यात आला आहे.दरम्यान या महोत्सवामध्ये पर्यटकांना महिला बचतगटांच्या माध्यमातून बनविण्यात येणा-या विविध स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येणार आहे. ग्रामीण कलाकारांच्या कलाकृतींचे स्टॉलही उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर सेंद्रिय खताद्वारे उत्पादित शेतमालाची विक्री करण्यात येणार आहे. आदिवासी नृत्य, महिला लेझीम पथक, गोफ कला या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून पर्यटकांना बैलगाडी सफारीचाही आनंद घेता येणार आहे.





