36.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ बांधकाम विभागात १० कोटीच्या कामात गैरव्यवहार;आ.रहागंडालेंचे मुख्य अभियंत्यांना पत्र

बांधकाम विभागात १० कोटीच्या कामात गैरव्यवहार;आ.रहागंडालेंचे मुख्य अभियंत्यांना पत्र

0
58

गोंदिया(खेमेंद्र कटरे)दि.22-जिल्हा परिषद ही विविध कारणांनी चर्चेत असते,त्यातच गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद सदस्य विठोबा लिल्हारे यांनी आपल्या मतदारसंघातील सुमारे ४० लाख रुपयाच्या बांधकामाचे पत्र आपल्याला न मिळाल्याच्या मुद्यावरुन शिक्षण व आरोग्य सभापतींच्या कक्षातच ठिय्या आंदोलन सुरु केले होते.हे प्रकरण अद्यापही निकाली निघालेले नसतानाच तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहागंडाले यांनी नागपूर येथील बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील ५-१० कोटी रुपयाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद सदस्य लिल्हारे यांच्यासारखीच अनेक जि.प.सदस्यांची अवस्था असून २३ जानेवारीला मार्ग न निघाल्यास सर्वसाधारण सभेच्या दिवशी आपण आंदोलन करणार असा पवित्रा लिल्हारे यांनी घेतला आहे.लिल्हारे यांच्या आंदोलनामुळे मात्र जिल्हा परिषद सदस्य हे कंत्राटाच्या कामासाठीच काम करतात की काय अशाही प्रश्न आत्ता निर्माण झाला आहे.
तर दुसरीकडे ज्या कामासंबधात आमदार रहागंडाले यांनी तक्रार केली,त्या कामाच्या निविदा,कार्यारंभ आदेश व देयके काढण्यासाठीचा कालावधी बघता घोळ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.आ.रहागंडाले यांच्या पत्रानुसार रस्ते दुरुस्तीच्या १८४ कामासाठी १७ डिसेंबर २०१९ रोजी काढलेली निविदा चुकीच्या पध्दतीने काढण्यात आली आहे.१७ डिसेंबरला निविदा काढण्यात आल्यानंतर लगेच ३ दिवसांनी २० डिसेंबरला कामाचे कार्यारंभ आदेश कसे देण्यात आले.कुठलीही निविदा काढल्यानंतर सात दिवसाचा कालावधी असतो.परंतु याठिकाणी ३ दिवसातच निविदा प्रकि आटोपून २० डिसेंबरला कार्यारंभ आदेश व ३१ डिसेंबरला संबधित कामाचे देयके काढण्यात आल्याने एवढ्या कमी वेळेत संबधित काम झाले कसे आणि त्या कामाची पाहणी कशी करण्यात आली असा प्रश्न आ.रहागंडाले यांनी उपस्थित केला आहे.
करारनामा ज्या कंत्राटदाराच्या नावे काढण्यात आले,त्यांची स्वाक्षरी न घेता तसेच सदर कंत्राटदारांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता देयके पोचविण्याचे काम जिल्हा परिषदेकडून झाल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.या सर्व प्रकरणात सुमारे ५ ते १० कोटी रुपयांची कामे न करताच अवैध रुपात देयके काढून गैरव्यवहार झाल्याचे म्हटले आहे.याप्रकरणातील सर्व कामांची सखोल चौकशी करुन निविदा प्रकया,कामाचे वाटप,कंत्राटदारांची केलेली बोगस स्वाक्षरी करारनामे करुन कार्यारंभ आदेश देणे,डांबरीकरणाची कामे बेरोजगार अभियंता व मजुर सहकारी संस्थाना देणे,अल्पावधीत कामे न करता देयके प्रदान करणे यासंपुर्ण प्रकरणाची तत्काळ चौकशी करुन देयके गोठवून संबधितावर कारवाई करण्याची मागणी आ.रहांगडालेंनी केली आहे.

विशेष म्हणजे गोंदिया जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग हा विद्ममान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जेव्हापासून रुजू झालेत,तेव्हापासून विविध माध्यमातून चर्चेला आलेला आहे.तर त्यांच्या त्रासामुळेच आम्ही गोंदिया जिल्हा परिषदेतून बदली करतोय असे बोलून काही अधिकाèयांनी आपले स्थानांतरणही करुन घेतले आहे.त्यामुळे विद्ममान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कामाची पध्दत कुठेतरी संशय निर्माण करणारी ठरल्याने त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेल्या सर्वच प्रकरणाची चौकशी करायलाही वाव निर्माण झालेला आहे.कारण बांधकाम विभागाचे प्रमुख हे अति.मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याने आ.रहागंडालेंनी केलेल्या तक्रारीचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

चौकशी सुरुं-मुकाअ
दरम्यान त्या पत्रानुसार मुख्य अभियंता नागपूर यांनी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठविले.त्या पत्राची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी स्वतः संपुर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.यासंदर्भांत विचारणा करण्यात आली असता मुकाअ डॉ.दयानिधी यांनी चौकशी सुरु असून कुणी दोषीं आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.