गडचिरोली,दि.23:- कृषी महाविद्यालय गडचिरोली अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतून पारडी ( कुपी ) येथे सात दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उद्घाटन सचिन अडसूळ जिल्हा माहिती अधिकारी व प्रमुख अतिथी आर. एल.पुराम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षास्थान डॉ.आर. एम. गाडे, सहयोगी अधिष्ठाता यांनी भुषविले. यावेळी पारडी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय निखारे, उपसरपंच संदिप निकुरे, तंटामुक्त अध्यक्ष लोंढे, सहयोगी प्राध्यापक डॉ.तांबे, डॉ अमरशेट्टीवार, गटविकास अधिकारी गडचिरोली सुनिता मरस्कोल्हे, व कृषी महाविद्यालय प्राध्यपक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आर. एल. पूराम यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्व पटवून दिले. तुकडोजी महाराजांनी ग्राम विकास कसा सांगितला आहे त्याबद्दल माहिती दिली. श्रमदानासाठी माणसे जोडून गावाचा विकास साधता येतो असे ते यावेळी म्हणाले . जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी ग्राम स्वच्छता व समाजप्रबोधन हे विषय मांडले. स्वच्छता फक्त शौचालय बांधकाम आणि स्वच्छ रस्त्यावरुन झाली असे म्हणता येत नाही. स्वच्छता योग्य झाली हे गावातील साथरोग व इतर आजार यांचे प्रमाण कमी झाल्यास ती चांगली झाली असे म्हणावे हे त्यांनी सांगितले. स्वच्छतेसाठी लोकांचे आरोग्य हा उद्देय समोर ठेवला तर आपण निश्चित स्वच्छ भारतचा उद्देश साध्य करु असे ते यावेळी म्हणाले.
गडचिरोली गट विकास अधिकारी सुनिता मारसकोल्हे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना श्रमदान व स्वच्छता या बद्दल माहिती दिली. डॉ. व्ही. जे. तांबे व डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार यांनी शिबीराचे महत्व सांगितले . पारडी ( कुपी ) या ठिकाणी 50 विद्यार्थी सात दिवस राहून गावात श्रमदान , गृहभेटी, ग्रामीण सर्वेक्षण व गृहपाठ , सांस्कृतिक कार्यक्रमातून समाजप्रबोधन करणार आहेत. सरंपच संजय निखारे यांनी केलेल्या कामातून गावाचा विकास साधया जात आहे. गावात आदर्श नेतृत्व निर्माण होण्यासाठी निखारे यांचे सारखे गुण असावे लागतात असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आर. एम. गाडे यांनी केले.




