भंडारा,दि. 24:- अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहणार असून धान खरेदी व नुकसान भरपाई या विषयावर लोकप्रतिनिधीसह मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जिल्हयाचे पालकमंत्री तथा सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ व मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली. धान खरेदी केंद्र वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी पाच दिवसात सकारात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले. शेतकरी व सामान्य माणूस यांच्या विकासासाठी शासन कटिबध्द असून आपण स्वत: या विषयावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा नियोजन समितीने सादर केलेल्या सन 2020-21 च्या 153 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडयास तसेच 2019-20 च्या खर्चास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.





