गोंदिया, दि.३०ः श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळाद्वारे संचालित गुजराती राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा संस्था शैक्षणिक क्रांतीतील मैलाचा दगड ठरला आहे. संस्थेच्या १०० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे आयोजन शनिवार, १ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता गुजराजी नॅशनल शाळेच्या प्रांगणावर करण्यात आले आहे.या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल्ल पटेल राहतील. उद्घाटन उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते होणार आहे. अदानी कंपनीचे संस्थापक व चेअरमन गौतम अदानी, कोकीळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्षा टीना अंबानी, अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. प्रिती अदानी, सुप्रसिद्ध लेखक व कलाकार पद्मश्री मनोज जोशी, गुजरातचे जयंत पटेल (बोस्की), मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात लावलेल्या शिक्षणरुपी रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. या वाटचालीत स्व.मनोहरभाई पटेल यांना अनेक महानुभवांचे मोठे योगदान लाभले आहे. यातील अनेक महानुभव आपल्यात नाहीत, अशा महानुभवांच्या स्मृतीत त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार देशातील मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी श्री गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळचे उपाध्यक्ष दीपम पटेल, अजय वडेरा,सचिव जयेश पटेल, सहसचिव विजयजोशी, चंद्रेश माधवानी, सदस्य निलेशपारेख, अवनेश मेहता, उमंग पटेल व सदस्य सहकार्य करीत आहेत.





