मुंबई,दि.03ः-वर्धा हिंगणघाट प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे व त्याच्यावर गुन्हे नोंद करून, भा.दं.वि कलम ३०७ आणि ३२६ ‘अ’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाईल अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागच्या सत्ताधारी लोकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर राजकीय फायदा करुन घेण्यासाठी केला होता. याच्या तक्रारी आल्यावर चौकशी करण्यासाठी दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल सहा आठवडयात दिला जाणार असल्याची माहितीही गृहमंत्री देशमुख यांनी दिली. या समितीमध्ये गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग, एसआयडीचे सहआयुक्त अमितेशकुमार या दोघा वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.नागपाडा येथे शाहीनबागच्या धर्तीवर जे आंदोलन सुरु आहे ते बेकायदा आहे. त्याची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही. आज संबंधित आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली असून, ते लवकरच आंदोलन मागे घेतील असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.





