39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ योग्य वेळी निदान, उपचाराने कर्करोग बरा होतो

योग्य वेळी निदान, उपचाराने कर्करोग बरा होतो

0
54
  • जागतिक कर्करोग दिन विशेष

वाशिम, दि. ०३ : आज ४ फेब्रुवारी. जागतिक कर्करोग दिन. कर्करोगाविषयी असणारे गैरसमज दूर करण्यासाठी आजपासून जिल्ह्यात जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच शिबिरांचे आयोजन करून सामान्यतः आढळणाऱ्या कर्करोगांची तपासणी करण्यात येणार आहे.

कर्करोग तपासणी शिबीर राबवून जिल्ह्यातील राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांचा शोध घेतला जातो.  यामध्ये गावपातळीवर जावून ३० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तींची ‘आशा’मार्फत प्राथमिक तपासणी करून संशयित रुग्णांना आरोग्य उपकेंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात पाठविले जाते. गर्भाशय, मुख कर्करोगाकरिता आरोग्य संस्थेमध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन विथ असेटिक अॅसिड (व्ही.आय.ए.) ची प्राथमिक तपासणी केली जाते. व्ही.आय.ए.ची तपासणी पॉझिटिव्ह असलेल्या तसेच स्तन व मुखकर्करोगाच्या संशयित रुग्णांची जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येते. तसेच संशयित रुग्णांच्या गाठीच्या माणसाचा तुकडा तपासणीसाठी पाठविला जातो.

एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान जिल्ह्यात गर्भाशयाच्या कर्करोगासाठी ३५६१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८६ संशयित रुग्ण आढळले. तपासणी अंती २ रुग्ण कर्करोगग्रस्त आढळले. स्तनाच्या कर्करोगासाठी १० हजार ५०८ महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४ संशयित रुग्ण आढळले व ५ रुग्ण कर्करोगग्रस्त आढळले. तोंडाच्या कर्करोगासाठी २६ हजार ४५९ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये ४ संशयित रुग्णांच्या संशयित गाठीच्या तुकड्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये २ रुग्णांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे आढळले. कर्करोगग्रस्त रुग्णांना पुढील उपचारासाठी संबंधित शासकीय व निमशासकीय कर्करोग रुग्णालयाकडे संदर्भित करण्यात आले आहे.

  • स्तनाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे :-

स्तनात किंवा काखेत गाठी, स्तनात सूज येणे किंवा स्तन जाड होणे, स्तनाच्या त्वचेवर सूज किंवा सुरकुत्या पडणे किंवा खळी पडणे, स्तनाग्र व स्तनावर त्वचा लालसर असणे किंवा खपली पडणे, स्तनाग्र आतमध्ये जाने किंवा आकारात बदल होणे किंवा दुखणे, स्तनाग्रातून दुधाव्यतिरिक्त स्त्राव किंवा रक्तयुक्त स्त्राव निघणे, स्तनाच्या भागात किंवा काखेत सतत दुखणे ही स्तनाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत.

  • तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे :-

तीन आठवड्यांपेक्षा अधिक तोंडात सतत जखमा असणे, तोंडात सतत वेदना होणे, हिरड्या, जीभ आणि घशात पांढरे आणि लाल चट्टे होणे, गळ्यात व्रण येणे किंवा आवाज घोगरा होणे, चावण्यास आणि गिळण्यास त्रास होणे, जीभ आणि जबड्याच्या हालचाली करताना त्रास होणे, मसाल्याचे पदार्थ खाताना त्रास होणे, जिभेला किंवा तोंडातील भागात रक्तस्त्राव किंवा बधिरता येणे, दातांना सैलपणा येणे किंवा जबडे आणि दात दुखणे, आवाजात बदल होणे किंवा बोलताना त्रास होणे, वजन कमी होणे, सतत अयोग्य श्वासोच्छवास, टोकदार दातांमुळे गालांना वारंवार चावल्यासारखे वाटणे ही तोंडाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे आहेत.

  • गर्भाशयाच्या कर्करोगाची सामान्य लक्षणे :-

दोन मासिक पाळी दरम्यान योनीतून रक्तस्त्राव होणे, मासिक पाळी जास्त काळ असणे किंवा नियमितपेक्षा जास्त जाणे, मासिक पाळी बंद झाल्यानंतर रक्तस्त्राव होणे, संभोगाच्या वेळी दुखणे, योनीतून दुर्गंधीयुक्त रक्तस्त्राव निघणे, असामान्य रक्तयुक्त योनी स्त्राव, कंबर दुखणे, थकवा येणे किंवा अत्यंत थकणे, कारण नसताना वजनात घट होणे, पायात दुखणे, लघवी करताना दुखणे हे गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत.

वरीलप्रमाणे कर्करोगाची लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, डॉ. अनिल कावरखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेळकर, डॉ. बालाजी हरण, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. लक्ष्मीकांत राठोड, डॉ. शेख, डॉ. आदित्य पांढारकर यांनी केले आहे.

योग्यवेळी उपचाराने कर्करोग पूर्णपणे बरा होतो- डॉ. अनिल कावरखे

वेळीच उपचार मिळाल्यास कर्करोग पूर्णतः बरा होवू शकतो. योग्य वेळी उपचार मिळण्यासाठी कर्करोगाचे योग्यवेळी निदान होणेही महत्वाचे आहे. त्यामुळे कर्करोगाची लक्षणे आढळ्यास घाबरून न जाता नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. अनिल कावरखे यांनी केले आहे.