अहेरी,दि.09ः- विधानसभा मतदारसंघाच्या मतदार पडताळणी कार्यक्रमात कसूर केल्याप्रकरणी अहेरीच्या नायब तहसीलदारांनी १९ शिक्षकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून संबंधित शिक्षकांवर गुन्ह दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये अमोल दर्योधन (४0), संजय येलमलवार (४५), अजय मधुकर सोनलवार (४0), निशिकांत तुळशिदास निमसरकार (३५), संजय भास्कर कोमटीवार (४१), संजय लक्ष्मण दुर्गे (३४), एस. एफ. कांदो (४५), आर. एस. उल्लीवार (४५), जनार्धन मडावी (४३),नारायण शामराव सिडाम (४६), मुकूंदराव चंदुजी शेडमाके (३५), विस्तारी रामय्या तलांडे (३७), एस. आर. गौतम (४४), सत्यवान गंगाधर खोब्रागडे (३२), सुरेश व्यंकटी दासरवार (४२), प्रशांत रामराव चव्हाण (४४), रितेश प्रभाकर येनगंटीवार (४१), डी. एस. वेलादी (३९), श्रीकांत मलेश राऊत (४५) यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकार्यांनी अहेरीच्या उपविभागीय अधिकार्यांना एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहेरीचे नायब तहसीलदार अनिल गुहे यांना प्राधिकृत अधिकारी नेमले होते. भारत निवडणूक आयोगाचे पत्र २३ डिसेंबर २0१९ व ११ नोव्हेंबर २0१९ अन्वये १ जानेवारी २0२0 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम निर्धारीत केलेला होता. त्यानुसार पूर्व पुनर्निरीक्षण उपक्रमांतर्गत ११ नोव्हेंबर २0१९ ते १३ फेब्रुवारी २0२0 या कालावधीत मतदार पडताळणी कार्यक्रम मोही रूपाने राबविणे आवश्यक होते. वरील १९ शिक्षक हे अहेरी पंचायत समितीअंतर्गत प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत असून त्यांनी या कार्यक्रमांतर्गत नेमून दिलेले कर्तव्य पार पाडण्यास कसूर केला. त्यामुळे सदर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची १३ जानेवारी २0१0 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली होती. कामास सुरुवात करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु १४ जानेवारी २0२0 च्या निवेदनाद्वारे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना नेमून दिलेले काम पार पाडण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यामुळे सदर १९ प्राथमिक शिक्षकांवर आपल्या कर्तव्याचा भंग केल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे.




