37.8 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home गुन्हेवार्ता सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला लाच घेताना एसीबीकडून अटक

सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला लाच घेताना एसीबीकडून अटक

0
23
नाशिक-सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिकाला लाच घेताना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये पुन्हा लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
नाशिकमधील येवला तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला 5 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदाराला सावकारी परवान्याचे नूतनीकरण करायचे होते. हे काम करून देण्यासाठी येवला तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याने यापूर्वी 60 हजार रुपयांची लाच घेतली होती. मात्र त्यानंतरही त्याने आणखी 7 हजार रुपयांची लाच तक्रारदाराला मागितली होती.
तडजोडीनंतर सहायक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला 5 हजार रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणात पुन्हा पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली व तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने येवला तहसील कार्यालयाच्या परिसरात आरोपी सुधीर वाघला पकडण्यासाठी सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताच मुख्य लिपिक सुधीर वाघ याला पकडले आहे.
पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरद हेंबाडे, युवराज खांडवी आणि चालक समीर शेख यांच्या पथकाने ही कडक कारवाई केली आहे. ज्या दिवशी नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती, त्याच दिवशी तहसील कार्यालयाच्या परिसरात ही कडक कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये स्वतःला एसीबी अधिकारी आहे असे सांगणार्या एका बनावट अधिकार्याला नाशिक पोलिसांनी अटक केली होती.
नाशिक शहरातील उद्योग भवन परिसरात एसीबीची पाटी लावलेल्या मोटारीत फिरणाऱ्या सचिन ठोके याच्याकडे बनावट ओळखपत्र सापडले होते. त्याचा साथीदार रवींद्र द्विवेदी फरार असून त्याचा नाशिक पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात एकीकडे एसीबीचे नाव वापरून फसवणूक करणारे बनावट अधिकारी सक्रिय आहेत. तर जिल्ह्यात काही ठिकाणी एसीबीचे अधिकारी लाचखोरांविरोधात कडक कारवाई करत आहे. या प्रकरणात पुढील तपास नाशिक पोलिस करत आहे.