भंडारा,दि.11-पवनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूनम विलास काटेखाये यांनी मागील तीन वर्षाच्या कार्यकाळात कामे न करताच कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत त्यांना तत्काळ अध्यक्षपदावरुन दूर करण्यात यावे, अशी मागणी पवनी नगर परिषदेचे उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर यांच्यासह अन्य नगरसेवकांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेतून केली.
डिसेंबर २0१६ मध्ये पवनी नगर परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत नगराध्यक्षा म्हणून नगर विकास आघाडीचे पूनम विलास काटेखाये निवडून आल्या. याशिवाय नगर विकास आघाडीचे ६, कॉंग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे ३, भाजप २, सेना १ असे नगरसेवक निवडून आले. त्यानंतर स्वीकृत सदस्य म्हणून नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये यांची निवड झाली. परंतु, मागील तीन वर्षात नगराध्यक्षा पूनम काटेखाये यांचे पती तथा स्वीकृत सदस्य विलास काटेखाये यांनी एकछत्री कारभार सुरू करुन आर्थिक अनियमितता सुरू केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
पवनीतील भाईतलाव, नेताजी वॉर्ड, पोलिस स्टेशन मागील बावनकर गोडावून ते लेपसे चौकपर्यंत पूर्ण रुंदीच्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन ४७ लाख ९0 हजार २00 रुपयांचे देयके उचलण्यात आले. पण ते काम पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. सार्वजनिक वाचनालय ते चांदेवार चौकपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण होऊन ४२ लाख २६ हजार ४00 रुपये उचलण्यात आले. पण, रस्ता कुठेच दिसून येत नाही. धोबी तलाव ते काटेखाये यांच्या शेतीपर्यंत सिमेंट क ॉंक्र ीट नाला बांधकाम पूर्ण होऊन देयक उचलण्यात आले. परंतु, सदर जागेवर नाल्याचे काम दिसून येत नाही. भिवापूरकर वाडी ते श्रीराम मंदिर शेतापर्यंत नाल्यास क ॉंक्र ीट संरक्षण भितीचे बांधकामाचे संपूर्ण देयक २ कोटी ४३ लाख ८ हजार ६२२ रुपये उचलण्यात आले. परंतु, काम अपूर्णच आहे. अशाप्रकारे अनेक काम पूर्ण झाल्याचे दाखवून देयक उचलण्यात आले. तर मग रस्ते, नाले, संरक्षण भिंत चोरीला गेल्या काय? असा प्रश्न यावेळी नगरसेवकांनी केला.
त्यामुळे नगराध्यक्षा पूनम विलास काटेखाये यांना महाराष्ट्र नगर परिषद, पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ (१) नुसार अध्यक्ष पदावरुन दूर करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.यावेळी उपाध्यक्ष कमलाकर रायपुरकर यांच्यासह, विकास राऊत, प्रकाश पचारे, मनोहर उरकुडकर, धर्मेंद्र नंदरधने, गोपाल नंदरधने, विजय उरकुडकर, ताराचंद तुळसकर, श्रीकांत जुमळे उपस्थित होते.



