गोंदिया,दि.13ः – कोरोनाच्या धास्तीने सोशल मीडियावर फैलावत असणाऱ्या अफवांमुळे कोंबडीचे मास खाणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी झाल्याने कुक्कुटपालन व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवले.त्यातच सरकारच्यावतीने या व्यवसायिकांच्या समस्यांकडे लक्ष न दिल्या गेल्याने गुरुवार(दि.12)पासून उपोषण आंदोलनाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरवात करण्यात आली आहे. कुक्कुटपालन व्यावसायिकांनी एकत्र येत कोंबड्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.चिकनपासून कोरोना होत नाही, याबाबतीत जनजागृती केली जाते. मात्र, ही भीती नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळे होळी सारख्या सणाला देखील कोंबडीच्या मांसाला अपेक्षित अशी मागणी नसल्याने गोंदिया जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायाला मोठा फटका बसत असून मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. झालेला खर्च तरी काढायचा कसा? हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे.दरम्यान, कुक्कुटपालन व्यावसायिकांनी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, विक्रीकरिता तयार असलेला माल योग्य भावात सरकारने उचलावा. कुक्कुटपालनासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज माफ करावे, परप्रांतातून येणाऱ्या कोंबड्यावर बंदी घालण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास सरकारी कार्यालयांमध्ये हजारो जिवंत कोंबड्या सोडून देण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात संजय बहेकार,स्वानंद पारधी आदी व्यवसायिक सहभागी झाले आहेत.



