गोंदिया,दि.19 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागु करण्यात आला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून नागरिकांना उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. मात्र, शहरातील अस्वच्छतेला घेवून राष्ट्रवादी काँग्रेसने नगर परिषद प्रशासनाला निवेदन देवून सतर्क केले. शहरातील स्वच्छता व्यवस्थेची काळजी घेवून प्रभात, वॉर्डातील नाल्या व केरकचर्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याने प्रशासनही अलर्ट आहे. वेळीच उपाययोजना करून विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नगर परिषदेच्या वतीने पाहिजे तेवढी तत्परता दाखविण्यात आलेली नाही. याबाबीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने १७ मार्च रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांची भेट घेतली. दरम्यान शहरातील समस्या व स्वच्छता व्यवस्थेवर चर्चा करून चिंता व्यक्त केली. वॉर्डातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली नाही. केरकचरा पडून आहे. यामुळे साथरोगाचा धोका आहे. अशात नगर परिषदेने त्वरित स्वच्छता कामगारांचे संघ बनवून शहरातील स्वच्छता व्यवस्था सुरळीत करावी, नाल्यांमध्ये कीटकनाशक व औषधींची फवारणी करण्यात यावी, कचर्याची विल्हेवाट लावावी, उपाययोजनात्मक कामे करावे, भविष्यात निर्माण होणार्या समस्येला वेळीच आळा घालावे, अशा आदि मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष अशेक सहारे, जिल्हा उपाध्यक्ष शिव शर्मा, राजु एन जैन, मनोहर वालदे, नानु मुदलीयार, महामंत्री दिपक कनोजे, राजेश दवे, खालीद पठाण, जितेश टेंभरे, राजेश कापसे, विष्णु शर्मा, नगरसेविका सविता मुदलीयार, संजु राय, करन टेकाम यांचा समावेश होता.





