35.3 C
Gondiā
Thursday, June 25, 2026
Home Top News राज्यात सर्वाधिक 49 कोरोनाग्रस्त रुग्ण; मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद

राज्यात सर्वाधिक 49 कोरोनाग्रस्त रुग्ण; मुंबईत डबेवाल्यांची सेवा बंद

0
312

मुंबई,दि.19(वृत्तसंस्था)ः- कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या देशात 179 झाली आहे. त्यातील 49 रुग्ण एकट्या महाराष्ट्रातून आहेत. तर 2 जण व्हेंटिलेटरवर असून इतरांची प्रकृती स्थिर आहे. राज्यात गेल्या 12 तासांत 7 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

49 पैकी 10 कोरोनाग्रस्त हे बाहेरच्या देशातून आलेले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असले तरी धोका मात्र वाढला आहे. त्यामुळे जनतेने राज्य सरकारने दिलेल्या सूचनाचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग टाळता येईल, असेही राजेश टोपे म्हणाले.

कोरोना संक्रमाणाचे देशात 6 नवीन प्रकरण समोर आले आहेत. यात उत्तर प्रदेश, चंदीगड आणि कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. महाराष्ट्रात शाळा आणि महाविद्यालयांचा बंद आणि बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम घोषित केल्यानंतर आता आयसीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. तत्पूर्वी सीबीएसईने सुद्धा असाच निर्णय घेतला. सोबतच, जेईईच्या परीक्षा सुद्धा 31 मार्च नंतरच घोषित केल्या जाणार आहेत.

पुणे शहरातील व्यापार बंद!

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुणे शहरातील किरकोळ व घाऊक व्यापार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. आज (गुरुवार दि.19 मार्च) पुणे व्यापारी महासंघाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी फेडरेशनशी संलग्न असलेल्या सर्व व्यापारी संघटनांचे पदाधिकारी हजर होते. दरम्यान सदर बंद मधुन जीवनावश्यक वस्तू व औषधे वगळण्यात आलेली आहेत.

168 ट्रेन रद्द, डबेवाल्यांच्या सेवा बंद, तिकीट रद्द केल्यास 100 टक्के रीफंड

मुंबईत डबेवाल्यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपल्या सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत जवळपास 5000 पेक्षा अधिक डबेवाले रोज घर आणि कार्यालयांमध्ये जेवणाचे डबे पुरवण्याचे काम करत असतात. डबेवाला संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल. तर दुसरीकडे, प्रवाशांचा घटलेला आकडा पाहता रेल्वे विभागाने 20 मार्च पासून 31 मार्च पर्यंत 168 रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच, तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना आता 100 टक्के रीफंड मिळेल. सोबतच, चेन्नई विमानतळावरून 50 आंतरराष्ट्रीय आणि 34 डोमेस्टिक विमान सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.

औरंगाबादेत 5 संशयितांच्या टेस्ट निगेटीव्ह

औरंगाबादमध्ये संशयित आढळलेल्या 5 जणांचा वैद्यकीय अहवाल आला. त्यामध्ये कुणालाही कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी गुरुवारी ही माहिती जारी केली. पाचही जणांचे अहवाल पुणे येथे पाठवण्यात आले होते. या सर्वांना मिनी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यानंतर यातील 2 जणांना मिनी घाटीत, एकाला घाटीत, एकाला खासगी रुग्णालय आणि एकाला घरीच क्वारंटाइन करण्यात आले होते. यात तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. दरम्यान, आता औरंगाबादमध्ये एकच कोरोनाग्रस्त असून तिच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तसेच प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

नागपूरमध्ये तीन दिवस हेअर कटिंग, सलून बंद

नागपूरमध्ये वाढत्या कोरोना व्हायरसवर लगाम लावण्यासाठी नाभिक महामंडळाने बंदचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनावश्यक दुकानदारांना बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार, नागपूर येथील हेअर कटिंग सलून व्यावसायिकांनी तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीत सापडला पहिला कोरोनाबाधित रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विटेकर यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शृंगारतळीच्या रुग्णाला कोरोना झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. या रुग्णाचे वय 50 वर्षे असून तो दुबईतून भारतात आपल्या गावी परतला होता. प्राथमिक लक्षणे आढळून आल्यानंतर त्याचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आले होते.

बीड : कोरोना विषाणु संसर्ग बाबत हेल्पलाईनवर संपर्क साधावा- जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हयातील जनतेस आवाहन केले आहे की,जे प्रवासी परदेशातुन दि.01 मार्च 2020 नंतर बीड जिल्हयात आलेले आहेत अशा सर्व नागरिकांनी आपल्या नजिकच्या आरेग्य केंद्रात जाऊन आपली आरोग्य तपासणी करुन घ्यावी.कोरोनाविषयक काही मार्गदर्शन हवे असल्यास कोरोना विषाणु संदर्भात हेल्पलाईन बीड जिल्हयातील जनतेला कोरोना विषाणु संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शक सुचना पाळाव्या. तथापि कोरोना विषाणु संदर्भात काही मदत, सुचना,अडचणी, शंकाअसल्यास खालील नमुद अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पाईन क्र.02442-22604 वर संपर्क साधावा