
गोंदिया,दि.21ः-देशात सध्या कोरोनाचा पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनसह संचारबंदी लागू असल्याने एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जाता येत नाही,अशा परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सोशल डिस्टंसचे पालन करुन आपणास गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्यायचा असल्याने गोंदिया जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांना भ्रमणध्वनीसह लेखी पत्राद्वारे बैठकीची मागणी खासदार सुनिल मेंढे यांनी केली.मात्र जिल्हाधिकारी डाॅ.बलकवडे यांनी जिल्हा सीमाबंदी असल्याने बैठक आयोजित करण्यास नकार दिल्याने आपण बैठक घेऊ शकलो नाही.जर आमच्याकरीता सीमा बंदी असेल तर मुंबईवरुन आलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यासांठी सीमा बंदीचे आदेश नाहीत काय असा प्रश्न उपस्थित करुन खासदार मेंढे यांनी जिल्हाधिकारी बलकवडे यांची राज्यसरकारच्या मुख्य सचिवाकंडे तक्रार करीत जिल्हाधिकारी यांनी राजकारण केल्याचा आरोप केला आहे.
खा.मेंढे यांच्या पत्रानुसार लोकप्रतिनिधी म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे ठरविले त्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया यांना ४-५ वेळा फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला.नंतर जिल्ह्याधिकारी गोंदिया यांना १५ एप्रिल रोजी सर्व संबंधितासह सोशल डीस्टसिंगचे कठोर पालन करून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यासाठी लेखी कळविण्यात आले.त्यावर जिल्हा बंदीचे कारण देत जिल्हाधिकारी यांनी बैठक आयोजित करण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे.
याउलट २० एप्रिल रोजी राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय अधिका-यांसमवेत बैठक घेतली. त्यासाठी ते रेड झोनमध्ये असलेल्या मुंबईहून गोंदिया येथे आले.तसेच सुनील केदार यांनी सुद्धा रेड झोनमध्ये असलेल्या नागपूरहून भंडारा येथे २-३ वेळा येवून शासकीय बैठकी घेतल्या.राज्यशासनातील सत्ताधा-यांसाठी एक नियम व विरोधकांसाठी दुजाभाव झाल्याचे स्पष्ट असल्याचे मेंढे यांनी म्हणत लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या विशेषाधिकाराचे उल्लंघन झाल्यामुळे खासदार मेंढे यांनी मुख्य सचिवांकडे जिल्हाधिकारी यांची तक्रार केली आहे.





