मुंबई दि.२१ एप्रिल- सर्व देशवासीय ऐक्य भावनेने आणि एकदिलाने काम करीत कोरोनाच्या संकटावर निश्चितच मात करतील. कोरोनाच्या संकटानंतर आपल्या समोर अर्थव्यवस्था सावरण्याचे तितकेच मोठे संकट उभे ठाकणार आहे, त्याचाही मुकाबला आपण अशाच ऐक्यभावनेने करुया, अशी भावना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज २१ एप्रिल रोज सकाळी लोकसभेतून देशातील सर्व राज्यांच्या विधानसभा अध्यक्षांशी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे विधानभवनातील आपल्या दालनातून या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी झाले.
प्रारंभी लोकसभा अध्यक्ष यांनी राज्य विधानसभा अध्यक्षांना संबोधीत केले. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, लोकसभा भारत शाखा ही सर्व राज्यातील राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या शाखांची मातृसंस्था आहे. संसदीय लोकशाहीच्या बळकटी करणासाठी देशात विविध उपक्रम त्याव्दारे राबविले जातात. तसेच दरवर्षी राज्य विधानमंडळांच्या पीठासीन अधिकारी यांची एक परिषदही लोकसभा सचिवालयातर्फे आयोजित केली जात असते. कोरोनाचे संकट टळल्यावर आगामी काळात हाती घेण्यात यावयाच्या उपक्रमांसंदर्भातही या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये विचारविनिमय झाला.
महाराष्ट्रात सर्व यंत्रणा कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. लवकरच आम्ही कोरोना पूर्णपणे नियंत्रीत करण्यासंदर्भात निर्णायक टप्पा गाठू. कोरोना नंतरचे अर्थव्यवस्था सावरण्याचे संकट देखील तितकेच आव्हानात्मक असणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, अन्नधान्य टंचाई, बेरोजगारी, उद्योग व्यापाराच्या समस्या यापुढे आणखी गंभीर होणार आहेत. त्यादृष्टीनेही आपण सखोल नियोजन करणे आणि कार्यवाहीची रुपरेषा आखणे आवश्यक आहे, या महत्वाच्या मुद्याकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या चर्चेप्रसंगी सर्वांचे लक्ष वेधले.




